संदीप कांबळे, कामठी :- स्त्री म्हणजे लाजाळु,दुबळी व भावनिक असा समाजात गैरसमज आहे परंतु वेळ पडल्यास हीच घरातील लक्ष्मी बिकट परिस्थितीला तोंड देऊन यशस्वी जीवनाची वाटचाल सुद्धा पार पाडते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या भारतीय संविधानामुळे व संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडी मारत आहे.अशीच कामठीतील हरदास नगर रहिवासी रंजना अशोक पानतावणे यांनी अत्यंत गरिबीच्या काटकसरीच्या परिस्थितीत स्वबळावर मेहनत करून आर्थिक कमकुवत परिस्थितीला परिश्रमातून तोंड देत,कुणासमोर हात न पसरता आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आत्मसम्मानाचे जीवन जगून मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करणे हेच ध्येय समोर ठेवून हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी रंजना ने मोलकरणीच्या कामापासून जीवनाची सुरुवात केली.पुढे लग्नसमारंभात खानावळीचे काम करीत परिश्रमातून गृहउद्योग च्या माध्यमातून ‘रंजना आचारी’या नावाने खानावळीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून जीवनात उत्तरोत्तम प्रगती केली.मुलांना शिक्षण दिले. मुलिचे लग्न केले तर मुलगा आईच्या उद्योगात तिला मदत करत आहे.या रंजनाताईच्या हातच्या जेवणाची चव लोकांना विसरताच येत नाही .प्रत्यक्षात अन्नपूर्णा मातेचा अवतार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. संपूर्ण कामठी शहरातच नव्हे तर शहराबाहेर तसेच इतर ठिकाणीसुद्धा यांच्या रंजना आचारी या नावाने प्रसिद्ध आहेत .त्यांनी आपल्या व्यवसायातून अनेक बेरोजगार मुलामुलींनाही रोजगार मिळवून दिला आहे.तर नुकत्याच संपन्न झालेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करीत नगरसेविका म्हणून निवडुन आल्या आहेत.असा मोलकरीण ते आचारी व नगरसेविका या यशस्वी जीवनाच्या प्रवासात नगरसेविका रंजना पानतावणे ही महिला एकदम हलाखीच्या परिस्थितीत बाहेर पडून आनंदी जीवन जगत आहे.त्यांचा हा संघर्ष इतर महिलासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.








