spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडचिरोलीतील शेतकऱ्यांसाठी दिलासाः रामागुंडम (तेलंगणा) येथून NFL युरियाचा रस्ते मार्गाने पुरवठा सुरू

गडचिरोली :- खरीप हंगाम २०२५ च्या खतांची टंचाईचा अभ्यास करून यापुढे खताची टंचाई भासू नये यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या कृषि विभागाने व जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तेलंगणा राज्यातील रामागुंडम येथील नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) कारखान्यातून गडचिरोली जिल्ह्यासाठी युरियाचा पुरवठा आता थेट रस्ते मार्गाने (By Road) सुरू करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळीच व योग्य दरात खत उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

रेल्वे रेकची प्रतीक्षा संपली

साधारणपणे खतांचा पुरवठा रेल्वे रेकद्वारे कंपनीच्या घाऊक विक्रेते/डीलर्स यांना केला जातो आणि तिथून पुढे जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना वितरण होते. मात्र, अनेकदा रेल्वे रेक उपलब्ध होण्यास विलंब लागल्यामुळे ऐन हंगामात खतांची टंचाई निर्माण होते. तसेच गडचिरोली जिल्ह्यात एकमेव देसाईगंज (वडसा) हे रेल्वे रेक केंद्र आहे, सध्यस्थित गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) व चंद्रपूर या २ रेक ठिकाणावरून खत पुरवठा होत असतो, परंतु सिरोंचा, अहेरी, भामरागड व एटापल्ली सारख्या भागात रेक ठिकाणापासून अंतर जास्त असल्याने खत वाहतूक व वाहतूक भाड्याच्या समस्या होत्या, ही अडचण लक्षात घेऊन, कृषी विभागाने मागील वर्षांपासून रामागुंडम (तेलंगणा) येथील नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) कारखान्यातून गडचिरोली जिल्ह्यासाठी युरियाचा पुरवठा थेट रस्ते मार्गाने (By Road) सुरू करण्यात यावा याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे रामागुंडम येथून ट्रकद्वारे थेट पुरवठा करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे व यातील पहिला टप्पा १०० मे.टन युरिया खत अहेरी येथे या आठवड्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्देः

१) रामागुंडम (तेलंगणा) येथील नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) कारखान्याचे १२ लाख मे.टन एवढे वार्षिक युरिया उत्पादन आहे.

२) आतापर्यंत वाहतूक अडचणी आणि पुरवठ्यातील विलंबामुळे गडचिरोली जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात युरियाचा तुटवडा जाणवत होता.

३) थेट वाहतूकः रामागुंडम ते सिरोंचा, अहेरी, गडचिरोली हे अंतर कमी असल्याने ट्रकमार्फत युरिया वेळेत पोहोचणे शक्य झाले आहे.

४) शेतकऱ्यांना दिलासाः धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात एकाच वेळी धानाची रोवणी होत असल्याने माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात खताची मोठी मागणी वाढून जाते. या पुरवठ्यामुळे दुकानांमध्ये युरिया सहज उपलब्ध होईल.

५) काळाबाजार रोखण्यास मदतः खतांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यामुळे चढ्या दराने विक्री किंवा काळाबाजाराला लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रिती हिरळकर, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कृषि विकास अधिकारी किरण खोमणे, मोहीम अधिकारी आनंद पाल, NFL कंपनीचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक सुरेश कुमार उज्जैनिया, सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक नागपूर शेखर मुंढे यांचे विशेष सहकार्य लाभले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.