– प्रेम मुंदाफळे विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवाराची ठोस मागणी
नागपूर :- पांढुर्णा जिल्ह्यातील मोरखा गावातील ऐतिहासिक धनगौरी बाबा (नागदेवता) मंदिराचा सर्वांगीण विकास करून भाविकांना अत्याधुनिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मंदिर परिसरात श्री संत रविदास महाराज समाजभवन उभारण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवार तर्फे अध्यक्ष प्रेम (हितेश) मुंदाफळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक तथा नागपूर लोकसभा खासदार नितीन गडकरी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, दर्जेदार रस्ते, भाविकांसाठी निवास व्यवस्था, पार्किंग, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करून धार्मिक स्थळाचे पावित्र्य कायम राखण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी प्रेम मुंदाफळे यांनी सांगितले की, “दरवर्षी लाखो भाविक धनगौरी बाबा मंदिरात दर्शनासाठी येतात. एवढ्या मोठ्या धार्मिक स्थळाकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. शासनाने तातडीने निधी मंजूर करून मंदिराचा सर्वांगीण विकास करावा आणि भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.” अशी मागणी केली आहे. याप्रसंगी ॲड. सुमीत पाचखंडे (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया), ॲड. नागेश गाजघाटे, ओम नवले, सचिन सिंगाळे, ॲड. भूषण झलके, पवन इंगोले, प्रिया मुंदाफळे यांच्यासह विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



