spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मेयो रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण

– पोलीस कर्मचारी आणि मुलावर हल्ल्याचा आरोप; घटना सीसीटीव्हीत कैद

नागपूर :- शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरला पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप आहे. ४ नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड)ने निष्पक्ष चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या अपघात विभागात ही घटना घडली. त्यावेळी संबंधित डॉक्टर गंभीर प्रकृतीच्या रुग्णावर उपचार करत होते. त्यांनी प्राधान्याने त्या रुग्णावर उपचार सुरू केल्याने तेथे उपस्थित असलेला पोलीस कर्मचारी आणि त्याचा मुलगा नाराज झाल्याचे सांगण्यात येते. याच कारणावरून दोघांनी डॉक्टरला मारहाण केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर संबंधित डॉक्टर तक्रार देण्यासाठी तहसील पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, तक्रार नोंदवण्यासाठी डॉक्टरांना सुमारे सहा तास प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप मार्डने केला आहे. तसेच, मारहाणीची तक्रार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्धच चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे आणि जीवितास धोका निर्माण करणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावाही संघटनेने केला आहे. दुसरीकडे, डॉक्टरांच्या तक्रारीवरून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धही स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मार्डने संबंधित पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाला अटक करावी, पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्या केल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास मेयोतील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र मार्डने राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही पक्षपाताशिवाय तपास सुरू असून, चौकशीनंतरच घटनेचे नेमके वास्तव स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Popular Articles