spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिवरखेड मंडळामध्ये महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर ! 

– अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १४ हजार हेक्टरवरील संत्रा पिकाची पाहणी ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संत्रा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केल्यानंतर प्रशासनाने या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू केली.

प्राथमिक माहितीनुसार हिवरखेड महसूल मंडळातील सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक बागांमध्ये आंबिया बहार संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे झाडांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

पाहणीदरम्यान कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध गावांतील संत्रा बागांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानाचे स्वरूप समजून घेतले तसेच तातडीने पंचनामे करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर आली.

यावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांना केवळ आश्वासने नकोत, तर तातडीची आर्थिक मदत आणि वस्तुनिष्ठ पंचनामे हवेत. अतिवृष्टीमुळे वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरले असून, शासनाने कोणताही विलंब न करता नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय, हिवरखेड महसूल मंडळातील सर्व बाधित गावांचे तातडीने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा पंचनामा करून राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे करण्यात आली.

यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उप विभागीय कृषी अधिकारी उज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके, माजी सरपंच नितीन काकडे, नानाभाऊ डवरे, गणेश घोरमाडे, उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे, मनोज भोपते, वैभव काळे, रोशन बारस्कर, विजय चढोकर, अतुल मस्के, मंगेश मानकर, सुरेश घोरमाडे, तलाठी सतीश वऱ्हाडे, कृषी सहाय्यक अवंतिका कोल्हे, संजय अंधारे, सौरभ अंधारे, मनीष काळे, मनोज लंगोटे, सीमा चिखले यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.

Popular Articles