spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जवाहरनगर परिसरात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाचा मोठा हातोडा; ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

– SDM माधुरी तिखे व तहसीलदार स्वतः मैदानात; दोन ट्रकसह नागपूरच्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल

हंसराज, प्रतिनिधी भंडारा जवाहरनगर :- भंडारा जिल्ह्यातील खरबी मौजा चेक पोस्ट परिसरात महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे दीड वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईत ८१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी (SDM) माधुरी तिखे आणि तहसीलदार यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून या कारवाईचे नेतृत्व केले.

मिळालेल्या माहितीनुसार, खरबी चेक पोस्ट परिसरातून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार ३ जानेवारी रोजी पहाटे १:३० वाजताच्या सुमारास महसूल पथकाने सापळा रचला. तपासणीदरम्यान टाटा कंपनीचे दोन ट्रक (क्र. MH 49 CF 5164 व MH 49 CK 5164) अडवण्यात आले. या ट्रकांची झडती घेतली असता, त्यामध्ये विनापास आणि कोणत्याही वैध परवान्याशिवाय अंदाजे २० ब्रास रेती अवैधरित्या नेली जात असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत महसूल विभागाने १ लाख २० हजार रुपये किमतीची २० ब्रास रेती आणि अंदाजे ८० लाख रुपये किमतीचे दोन ट्रक, असा एकूण ८१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी राकेश प्रकाश सोनकुसरे (वय ४०, परसोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी ट्रक चालक व मालक अर्जुन पप्पु जाधव (वय ४३, रा. शिवशक्ती नगर, पारडी, नागपूर) आणि अजय चैनसिंग पटले (वय २८, रा. भवानी नगर, पारडी, नागपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ई), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७) (८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ अन्वये कायमी अप. क्र. ०१/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही कारवाई केवळ सुरुवात असून आगामी काळात अधिक कठोर पावले उचलली जातील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि महसूल विभाग करत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.