– मोबाईल, रोख रक्कम व दुचाकीसह १ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; पोलिसांची तत्पर कारवाई
कामठी :- दहेगाव रंगारी परिसरातील नांदा उड्डाणपुलाजवळ एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि दुचाकी जबरीने घेऊन पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अवघ्या एका तासात ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी सतीश रामदासजी मानकर (वय ४०, रा. वॉर्ड क्रमांक ५, दत्त मंदिरामागे, दहेगाव रंगारी, ता. सावनेर) हे नांदा उड्डाणपुलाच्या परिसरातून जात असताना आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील मोबाईल, दोन हजार रुपये रोख आणि युनिकॉर्न दुचाकी जबरीने घेऊन आरोपी पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीचे अधिकारी आशिष कोहळे तसेच पोलीस हवालदार संदीप सगणे, पोलीस शिपाई शेखर वानखेडे आणि पोलीस शिपाई बादल गिरी यांच्या पथकाने तातडीने आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रफुल उर्फ मतदार किशोर राऊत (वय ३०/३१, रा. इंद्रानगर, प्रगतीनगर, कोराडी) आणि आशिष ओमकार वासनिक (वय ३१, रा. सिद्धार्थनगर, महादुला, कोराडी) यांना अवघ्या तासाभरात ताब्यात घेतले.
आरोपींकडून दोन हजार रुपये रोख, ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि युनिकॉर्न दुचाकी असा एकूण १ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी रात्रीचे अधिकारी एपीआय विनोद जोकार यांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, आरोपींपैकी प्रफुल राऊत हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.





