पांढरकवडा :- शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत पांढरकवडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आतिश (सोनू भैय्या) बोरले यांनी दिवाळीनिमित्त त्यांचा सन्मान करून माणुसकीचा आणि कृतज्ञतेचा संदेश दिला. दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. या आनंदात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असावा, या भावनेतून १२ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष आतिश बोरले यांनी नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा, यासाठी स्वच्छता कर्मचारी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. पहाटेपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या मेहनतीमुळेच शहराच्या स्वच्छतेचा दर्जा टिकून आहे. मात्र, त्यांच्या या योगदानाची अनेकदा पुरेशी दखल घेतली जात नाही. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला. केवळ विकासकामे करणे म्हणजे लोकप्रतिनिधींची जबाबदारी नसून, शहरासाठी प्रत्यक्ष कष्ट घेणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून हा उपक्रम राबविल्याचे नगराध्यक्ष आतिश बोरले यांनी सांगितले. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा छोटासा प्रयत्न उपस्थितांसाठीही प्रेरणादायी ठरला. कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेवक मंगेश वातीले, अनिल बोरेले, रुपेश कुटकलवार, श्रीराम मेल्केवार, नगरसेविका शीतल बाजोरिया, प्रियंका बोकीलवार आणि रेखा चितारलेवार यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवून त्यांना सन्मान देण्याचा नगराध्यक्ष आतिश बोरले यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला.
Latest News
Related Posts
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त सन्मान; नगराध्यक्ष आतिश बोरले यांचा स्तुत्य उपक्रम!






