– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा टोला
– राऊतांनी हिंदुत्व सोडून इटली धर्म स्वीकारला
मुंबई :- काँग्रेसकडून सुपारी घेऊन खा.संजय राऊत यांनी उबाठा गटाला संपवण्याचे काम केले. आता राज ठाकरे यांच्या मनसेला संपवण्याची सुपारी ही राऊतांनी घेतली आहे का असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी लगावला. मात्र मनसेला संपवण्यात ते यशस्वी होतील असे वाटत नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रखरपणे हिंदुत्वाची भूमिका मांडणारे, भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे हे उठताबसता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणा-या काँग्रेससोबत जाण्याची शक्यता कमी आहे आणि राज यांचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा काँग्रेसला सहन होणार नाही असेही बन म्हणाले.
नाशिकमधील गुंडगीरीला आळा घातल्याबद्दल राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेतून कौतुक केले, यावर कोपरखळी मारत बन म्हणाले की, रोजच अशी पत्रकार परिषद घेऊन राऊतांना देवाभाऊंचे अभिनंदन करावे लागेल. नाशिक तर सुरुवात आहे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील गुंडगीरी देवेंद्र फडणवीस संपवणार आहेत. संपर्कप्रमुख असताना संजय राऊतांनी ज्या नाशिकमध्ये गुंडगीरीला खतपाणी घातले त्या नाशिकच्या गुंडगीरीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाप लावला. गुंड कोणत्याही पक्षाचा असो कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. भाजपाचा कुठल्याही गुंडाला पाठिंबा नाही ,रविंद्र धंगेकरांनी गुंडगिरी बद्दल बोलण्याआधी आत्मपरिक्षण करावे असा टोलाही बन यांनी लगावला.
राऊत यांनी हिंदुत्व सोडून इटलीचा धर्म स्विकारला आहे. उबाठा गटाचे मुखपत्र सामना मधील अग्रलेख हे काँग्रेसचे अग्रलेख असतात. काँग्रेसची भाषा अग्रलेखातून दिसून येते. ज्या राऊतांनी दुस-याचा धर्म स्विकारला आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व आणि धर्म शिकवू नये असेही बन यांनी खडसावले.
उबाठा गट ही सोनिया-राहुल यांच्या काँग्रेसची बेनामी शाखा आहे
राऊत यांचा उबाठा गट हा दिल्लीतील काँग्रेसच्या दावणीला बांधला गेला आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय दिल्लीश्वर सोनिया, राहुल घेणार. उबाठा गट ही काँग्रेसची बेनामी शाखा आहे. दिल्लीहून हिरवा कंदील मिळाला नाही म्हणून राज ठाकरे यांच्या मनसे सोबत आघाडी करायची की नाही याची अधिकृत घोषणा झालेली नाही. परवानगीच्या प्रतीक्षेत उबाठा गट आहे अशी खोचक टिप्पणी बन यांनी केली.
लोककल्याणाची एकही योजना बंद होणार नाही
रोहित पवार यांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांच्या योजनांबद्दलचा इतिहास वाचावा आणि मग देवाभाऊंवर टीका करावी असा टोमणा बन यांनी लगावला. जनहिताच्या योजना बंद होणार अशी आवई उठवून दिशाभूल करू नये. महायुती सरकार जनहिताची तसेच विद्यार्थ्यांच्या कल्याणाची एकही योजना बंद करणार नाही. उलटपक्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने अडीच वर्षांच्या काळात पायाभूत विकासाच्या अनेक योजनांना व प्रकल्पांना खीळ घातली. मेट्रो कारशेड, कोस्टल रोड,समृद्धी,मराठवाडा वॉटर ग्रीड,जलयुक्त शिवार योजनांना स्थगिती दिली. तसेच पीएम किसान चा निधी रोखला,पोलीस, ग्राम सेवक, शिक्षक भरती रोखली,महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक रोखली आणि पीएम आवास योजनेच्या निधीचा लाभ देखील रोखला.
संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न कराल तर तोंड पोळेल
अनेकांनी संघांवर बंदी घालण्याचे प्रयत्न केले पण जेव्हा जेव्हा असे प्रयत्न झाले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुप्पट ताकदीने उभा राहीला आहे. संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न कराल तर तोंड पोळेल असा इशाराही श्री बन यांनी दिला. कभी थे अकेले, हुए आज इतने| तभी न डरे तो भला अब डरेंगे|| या अटलजींच्या कवितेच्या ओळींचा दाखला देत श्री. बन म्हणाले देशातील नव्हे तर जगातील कोट्यवधी स्वयंसेवकांच्या बळावर संघ जनतेचा आवाज बनून काम करत आहे. तेव्हा संघावर बोलण्याची तुमची पात्रता नाही.








