spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय लोकशाही दिनात दोन तक्रारी प्राप्त

– तक्रारीसंदर्भात चंद्रपूर मनपाला स्पष्ट अभिप्राय देण्याच्या विभागीय आयुक्त यांच्या सूचना

नागपूर :- विभागीय लोकशाही दिनात चंद्रपूर महानगरपालिकेशी संबंधित अतिक्रमणाबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी तक्रारीसंबंधात स्पष्ट अभिप्राय व उत्तर देण्याच्या सूचना मनपाला केल्या आहेत.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील दोन तक्रारी प्राप्त झाल्या. यातील पहिल्या तक्रारीनुसार तक्रारदाराने त्यांच्या राहत्‍या घरामागील सभागृहालगत गल्लीत त्यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले. या विषयाबाबत मनपाच्या सहायक रचनाकार यांच्याकडून साध्यंत माहिती घेतली व या प्रकरणात मनपाने तक्रारदाराने नमुद केलेल्या जागेची प्रत्यक्ष मोजणी करून स्पष्ट अभिप्राय देण्याच्या सूचना बिदरी यांनी केल्या.

अन्य एका तक्रारीनुसार तक्रारदाराच्या मालकीच्या जागेवर रस्ता बांधकामाद्वारे मनपाकडून अतिक्रमण झाल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने मनपाकडून संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणाबाबत तक्रारदार व मनपा अधिकारी यांच्याकडून माहिती घेवून बिदरी यांनी मनपाकडून स्पष्ट उत्तर देण्याच्या सूचना केल्या. यावेळी अपर आयुक्त सामान्‍य प्रशासन तेजूसिंग पवार यांच्यासह कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

लोकशाही दिनानंतर बिदरी यांनी उपस्थित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील अनुकंपतत्वावरील भरती प्रक्रिया तातडीने निकाली काढण्याच्या सूचना केल्या. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये महिलांवरील लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या निराकरणासाठी लैंगिक छळ प्रतिबंधात्मक समिती (पॉश) समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या. ज्या कार्यालयांमध्ये महिलांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. अशा महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पॉश समितीमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले.

Popular Articles