– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई :- जनाब संजय राऊतांनी संपूर्ण उबाठा गट संपवून पक्षाची वाट लावली. कदाचित शरद पवार साहेबांकडचा पगार बंद झाल्याने आता राहुल गांधींची चाकरी करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्या काळजातून बाण आरपार ठोकत मातोश्रीत बसून राहण्याची अवस्था तुमच्यावर आणलीय. संजय राऊत ‘नटरंग’ चित्रपटातल्या अतुल कुलकर्णीच्या भूमिकेत आल्याचे आज महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे जास्त फडफड करण्यापेक्षा बाण मातोश्रीत नेमका कुठे घुसलाय हे शोधलात तर तुमच्या काळजाला झालेल्या जखमा पहायाला मिळतील, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मेंदू बधिर झालेल्या संजय राऊतांवर सिंगापूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी मी स्वतः वर्गणी काढेन. देवाभाऊंचा मेंदू काय आहे हे महाराष्ट्राने 2014 आणि 2019 ला पहात त्यांना मुख्यमंत्री केले. त्यांना महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. तुमच्या मेंदूला नारू झाल्याने तुम्हाला घरी बसवले. मेंदूला नारू झालेल्यांनी देवाभाऊंवर टीका करू नये. संजय राऊत, तुम्हाला भांडुपच्या गाढव नाक्यावरच्या गाढवांचे तरी आशीर्वाद आहेत का? तुम्ही जी कॉमेडी सर्कस करताय ते पाहून गाढवही हसणार नाहीत, अशी खिल्ली बन यांनी उडवली.
तुमच्या मालकाला जनतेने एकदाही मुख्यमंत्री केले नाही. एकदाच मुख्यमंत्री झालात ते भाजपाचा विश्वासघात करून आणि बहुमतावर दरोडा टाकून. हा तुमच्यात आणि देवाभाऊंमध्ये फरक आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘एक तर तू राहशील, मी राहीन’ तेव्हा महाराष्ट्रातील जनता देवाभाऊंच्या पाठीशी उभी राहिली. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी 14-15 आमदारही नाहीत. अडीच वर्षं देवाभाऊ विरोधी पक्षनेते असताना तुम्हाला सळो की पळो करून सोडले, हा इतिहास असल्याने इतर कुणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाद करू नका, अशा शब्दात बन यांनी चांगलेच फटकारले.
संजय राऊत, विरोधी पक्षनेता अभिनेता असावा लागत नाही तर चांगला नेता असावा लागतो. अभिनेता चित्रपटांमध्ये काम करतो तर नेता जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करतो. दुर्दैवाने तुम्ही अभिनेत्याला नेता म्हणून निवडल्याने तुमची ही अवस्था झाली आहे. राहुल गांधी जर चांगले अभिनेता असतील तर त्यांनी एखाद्या रॉकस्टार चित्रपटात किंवा कॉमेडी सर्कसमध्ये काम करावे. कॉमेडी किंगसारखे लोकांचे मनोरंजन करण्याचे काम विरोधी पक्षनेत्याचे नसते. कॉमेडी करून जनतेचे मनोरंजन करू शकता. परंतु कॉमेडी शोला लोक गांभीर्याने घेत नाहीत. कॉमेडी किंग राहुल गांधी तुम्हाला जगातील सर्वोच्च नेता वाटायला लागले. कारण सिल्व्हर ओकची गुलामी बंद करून आता राहुल गांधींची गुलामी करण्याचे धंदे तुम्ही सुरू केलेत, असे म्हणत बन यांनी त्यांना फैलावर घेतले.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जायचे की गल्लीत राहायचे, याचा निर्णय जनतेने घेतल्याचे सांगून बन पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि 2029 लाही देवाभाऊंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार येणार आहे. तुम्हाला मात्र 2029 नंतर भांडुपच्या गल्लीतच राहावे लागणार आहे. उद्धव ठाकरे 2029 ला लंडनमध्ये असतील का मुंबईत, तसेच ते राज ठाकरेंसोबत, काँग्रेससोबत की समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्यासोबत लढणार की मुस्लिम लीगसोबत आघाडी करणार याची चिंता संजय राऊत यांनी करावी.





