– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची घणाघाती टीका
मुंबई :- मराठी भाषेचा शब्दकोश, विश्वकोश असतो, तसा नर्कतीर्थ संजय राऊत यांनी एक अश्वकोश तयार करून त्याचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करावे. जे शब्द ते जाहीरपणे वापरतात त्यासाठी शब्दकोश नाही तर अश्वकोश हाच शब्द योग्य राहील. त्यांनी वापरलेल्या या शब्दांमुळेच उबाठा गटाची पार वाट लागली आहे, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते आणि केरळमध्ये काँग्रेस जिंकते तिथे लोकशाहीचा विजय असतो. तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकले की लोकशाहीचा विजय असतो, असे सुनावत बन म्हणाले, गेली पंधरा वर्षे पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींनी आपल्या राजवटीत जी दादागिरी, गुंडगिरी केली ते पाप धुऊन काढण्याचे काम पश्चिम बंगालच्या जनतेने केले. तसेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सरकारचे अडीच वर्षाचे पाप धुवून काढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं. जनतेने भाजपा – महायुतीला आशीर्वाद दिले. राहिला प्रश्न निवडणूक आयोगाचा. तामिळनाडूमध्ये एसआयआर झाले तिथे विरोधक जिंकले,केरळमध्ये एसआयआर झाले तिथे काँग्रेस जिंकली आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआर होऊन भाजपा जिंकली असेल तर तुम्हाला एवढ्या मिरच्या का झोंबताहेत? जनता सुज्ञ असते. त्यांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे, हे लक्षात ठेवा.
पतन कुणाचे झालेय हे देशाने पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश विकासाच्या मार्गावर चालला आहे. आम्ही बदल्याचे राजकारण करत नाही. लोकांच्या जीवनात बदल झाला पाहिजे यासाठी आम्ही राजकारण करतो, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावे. दिवा कुणाचा विझलाय हे पाहण्यापेक्षा तुमची अगरबत्ती विझलेली आहे, ते पहा. ‘अंधेरा छटेगा, कमल खिलेगा’, हे आम्ही वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झाले. पश्चिम बंगाल, आसाममध्ये जी त्सुनामी आली, पुद्दुचेरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात यश मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शेवटचे यश महाराष्ट्रात 2019 मध्ये मिळाले होते. उद्धव ठाकरेंच्या गटाचा दिवा पार विझायला आलाय, त्याकडे लक्ष द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 140 कोटी जनतेची सेवा करतात आणि तुम्ही कितीही शिव्या दिले तरी जनतेच्या आशीर्वादाने त्याचा काहीही परिणाम होणार नाही, या शब्दात बन यांनी खडसावले.
संजय राऊतांची लोकप्रियता अंतराळात पोचली
इंदिरा गांधी कधीकाळी सर्वात लोकप्रिय नेत्या होत्या. परंतु आजच्या घडीला संजय राऊत यांची लोकप्रियता महाराष्ट्र, देश, संपूर्ण जगच नाही तर त्यापलीकडे जात अंतराळातही क्रमांक एकवर आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त एकच नाद घुमतो तो म्हणजे संजय राऊत, संजय राऊत. संजय राऊतांची वक्तव्ये ऐकून उद्धव ठाकरे तर तोंडाला रुमाल लावून हसत असतील, अशा शब्दांत बन यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.