नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा प्रचंड साठा जप्त केला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल १ कोटी ३३ लाख ५४ हजार ७२० रुपये इतकी आहे. दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सावनेर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंबिका हॉटेल कळमेश्वर ते सावनेर बायपास रोडवरून सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी केली असता अशोक लेलंड कंपनीचे १० चाकी कंटेनर वाहन क्रमांक आरजे ११ जीडी ३१३१ अडविण्यात आले. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित पान मसाला आढळून आला. वाहन चालक जाहिद अयुब रा. बिजोपूर, ता. गोची, जि. फरीदाबाद, हरियाणा याला अटक करण्यात आली असून चौकशीत त्याने सदर प्रतिबंधित पान मसाला इंदूर येथील गोल्डन अॅरोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी येथून आणल्याचे सांगितले. तपासात वाहन मे. व्यंकटेश्वर लॉजिस्टिक, राजीव नगर फेज २, बेगमपुर, नवी दिल्ली यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात एकूण ९० हजार ४५६ किलो सुगंधित पान मसाला किंमत १ कोटी ८ लाख ५४ हजार ७२० रुपये तसेच कंटेनर वाहन किंमत २५ लाख रुपये असा एकूण १ कोटी ३३ लाख ५४ हजार ७२० रुपयांचा साठा आहे. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मानवी आरोग्यास अपायकारक असून त्याच्या उत्पादन, विक्री, साठा व वाहतुकीवर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात वाहन चालक, वाहन मालक आणि इंदूर येथील कंपनी मालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध सुगंधित तंबाखू पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला असून पुढील तपास सुरु आहे.



