1183 अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईचे आदेश
नागपूर २१ : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या पत्रानुसार, जिल्हा परिषदेमधील तब्बल 1183 अधिकारी व कर्मचारी यांनी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक घेतलेल्या या लाभामुळे शासनाची दिशाभूल झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला व बाल विकास विभागाने संबंधित जिल्हा परिषदांना पत्राद्वारे कळवले असून, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्यावरच कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यासोबतच, या प्रकरणातील संपूर्ण अहवाल महिला व बाल विकास विभागाला पाठवण्याचे तसेच ग्रामविकास विभागालाही प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात होत असलेली ही मोठी कारवाई इतरांनाही कठोर संदेश देणारी ठरणार आहे.



