– वरूड-मोर्शी तालुक्यातील मातोश्री पाणंद रस्ते कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह !
– हजारो नागरिकांच्या नावावर बोगस मस्टर, चौकशीच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- वरूड आणि मोर्शी तालुक्यात मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो नागरिकांच्या नावावर बोगस मस्टर तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची देयके काढण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणाबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
वरूड मोर्शी तालुक्यात अनेक कामांवर प्रत्यक्ष मजूर उपस्थित नसताना मस्टर रोलमध्ये नावे दाखविण्यात आली आहेत. काही ठिकाणी कामे अपूर्ण असतानाही मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल मजुरीची बिले सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वरूड आणि मोर्शी तहसील कार्यालयामार्फत शेकडो पाणंद रस्त्यांच्या कामांची देयके मंजुरीसाठी पुढे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वी ही देयके अदा करण्यात आल्यास पुरावे नष्ट होण्याची आणि भ्रष्टाचार झाकण्याची भीती व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी मनरेगा आयुक्त नागपुर तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची दिनांक २५ मे रोजी भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मनरेगा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी रोहयो यांना तत्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असताना सुद्धा वरूड तहसीलदार यांनी २७ मे रोजी ८ कोटी १४ लक्ष ५९ हजार ७१६ रुपयांचे राज्य रोहयो पूरक निधी बिल उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे सादर केले असता उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी कुठल्याच प्रकाराची चौकशी न करता ८ कोटी १४ लक्ष रुपयांचे बिल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे सादर केल्यामुळे मनरेगा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व देयके स्थगित ठेवावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे. तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वरूड मोर्शी तालुक्यातील पांदण रस्त्यांची सर्व कामे नियमाप्रमाणे झाली असतील तर चौकशी करण्यास प्रशासन घाबरत का आहे. तक्रारींनंतरही कारवाई होत नसेल तर भ्रष्टाचाराला कोणाचे संरक्षण आहे असे अनेक प्रश्न वरूड मोर्शी तालुक्यातील नागरिकांमध्ये उपस्थित केल्या जात आहे.
आता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करणार का, की मनरेगाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांकडे पुन्हा दुर्लक्ष होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








