spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

झरप येथे भात शेती शाळेच्या द्वितीय वर्गाचे आयोजन

कामठी :- उपविभागीय कृषी अधिकारी, नागपूर डी. बी. येळे, तालुका कृषी अधिकारी – पी.आर. गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० (NDKSP 2.0) अंतर्गत मौजा झरप, ता. कामठी येथे  वैभव काकडे यांच्या शेतात भात शेती शाळेचा द्वितीय वर्ग उत्साहात संपन्न झाला. या वर्गामध्ये भात पिकाच्या आधुनिक व हवामान अनुकूल लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांना भात पिकासाठी शेताची योग्य तयारी, रोपावस्था, रोपांची पुनर्लावणी, पुनर्लावणीनंतरचे पीक व्यवस्थापन तसेच येसराय (SRI) पद्धतीने भात लागवडीचे तंत्र व फायदे याविषयी माहिती देण्यात आली. कमी वयाची रोपे, योग्य अंतरावर लागवड, पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन, वेळेवर तण नियंत्रण तसेच कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन यामुळे भात पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते, असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक व हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करत अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या शेती शाळेस विशाल कव्हर (कृषी सहाय्यक), ऋतुजा भु. तवले (समूह सहाय्यक) आणि समीक्षा भोयर (कृषी ताई) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Popular Articles