जीवनशैलीतून उद्भावणारे आजार रोखण्यासाठी
भारतीय आरोग्यशास्त्राचा अभ्यास व्हावा – भैय्याजी जोशी
नागपुर, २० : आधुनिक जीवनशैलीतून उद्भवणारे आजार रोखण्यासाठी आपले परंपरागत भारतीय आरोग्यशास्त्र, विशेषतः आयुर्वेद, योग व जीवनशैली शास्त्र यांचा अभ्यास व प्रचार-प्रसार आवश्यक असल्याचे प्रतिपादन पूर्व सरकार्यवाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. आरोग्य भारती नागपूर व निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूरतर्फे रविवार, १७ ऑगस्ट रोजी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथील कन्व्हेंशन सेंटरमध्ये ‘इंटिग्रेटिव्ह अन्कॉलॉजी – आयुर्वेद व ऍलोपॅथी’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर एनसीआयचे सचिव शैलेश जोगळेकर, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक आणि वाघोलीच्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सदानंद सरदेशमुख आणि आरोग्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र क्षीरसागर उपस्थित होते.
परिसंवादत सहभागी डॉक्टरांनी आपआपल्या पॅथीतील अनुभव कथन केले. यानिमित्ताने आरोग्य सेवेत भारतीय चिकित्सा पद्धतींचा वापर परिणामकारक पद्धतीने कसा होऊ शकतो याविषयी सखोल चर्चा झाली. अनेकांनी प्रतिबंधात्मक आरोग्य, जीवनशैली सुधारणा, आहारशास्त्र व मानसिक आरोग्य या विषयांवर विचार मांडले.
यानिमित्ताने पुण्याच्या वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या आयआरसीटीसी केंद्राच्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या चमूने त्यांच्या संस्थेतर्फे गेल्या ३० वर्षांमध्ये कॅन्सरवर आयुर्वेदामध्ये करण्यात आलेले संशोधन व उपचार आदींची विस्ताराने माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नागपूर व विदर्भातील काही जिल्ह्यांच्या ठिकाणाहून विविध पॅथींचे डॉक्टर्स आणि जाणकार मिळून २०० जण एकत्र आले होते. यावेळी भारतीय संस्कृती दर्शन संस्थेची जगमान्य झालेली विविध संशोधने व भारतातील व अमेरिकेतील पेटंट मिळविलेली आयुर्वेदिक औषधे याविषयीही माहिती देण्यात आली. रेडिओथेरपी व केमोथेरपीमुळे जे साईड इफेक्ट्स होतात त्याचा रुग्णांना खूप त्रास होतो. तो आयुर्वेदिक औषधांनी कसा कमी होईल यावर भारतीय संस्कृती दर्सन ट्रस्टतर्फे संशोधन करण्यात आले असून, त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत.
या परिसंवादात विविध शाखांमधील डॉक्टर, वैद्यकीय शिक्षक, संशोधक, विविध वैद्यक शाखांचे विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विवेक धोंगडी व डॉ. अंजली देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी केले. वैद्य आनंद टेंभुर्णीकर यांनी आरोग्य विषयात काम करणाऱ्या सगळ्या संघटनांचे आभार मानले.








