यवतमाळ :- आपले विहित कर्तव्य योग्यरीत्या बजावणे हीच खरी देशसेवा असते. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमात ‘मिशन मोड’वर कामे करून अधिकाधिक नागरिकांना योजनांचा, तसेच महसुली सेवेचा लाभ मिळवून द्यावा. त्याचप्रमाणे मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे, शिक्षण, आरोग्य व इतर गरजांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे की नाही याची चौकशी करून त्यांच्या समस्या दूर करण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज येथे केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) संपूर्ण राज्यात ‘सेवा पंधरवडा’राबवण्यात येत असून, त्याचा शुभारंभ आज झाला. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हाधिकारी मीना म्हणाले की, सेवा पंधरवड्यात सीएससी केंद्रांचे सशक्तीकरण करून ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सहजपणे मिळावा. तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी वाळूची मागणी व पुरवठा यामधील समन्वय साधण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, जुनी वादग्रस्त प्रकरणे लोकअदालतीतून तडजोडीने निकाली काढणे, आदी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपण जी कामे करतो ती जनहिताप्रमाणेच आपल्या आत्मिक व प्रशासनिक विकासासाठीसुद्धा आहेत. आपली जबाबदारी आपण योग समजून पार पाडली, तर आपण खरे कर्मयोगी आहोत. देशभक्ती दाखवण्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही, आपण प्रामाणिकपणे आपली कामे केली तरी तीच खरी देशसेवा ठरेल.
सेवा पंधरवडा उपक्रमाच्या माध्यमातून महसूल प्रशासन लोकांच्या अजून अधिक जवळ जाईल व सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या सेवांपर्यंत सुलभपणे पोहोचता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी विकास मीना यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक बनवणे हा आहे.
या पंधरवड्यात तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात येईल, ज्यात गावातील सर्व रस्त्यांची यादी तयार करून १७ सप्टेंबर रोजी ग्रामसभेत ती अंतिम केली जाईल. अतिक्रमण झालेल्या रस्त्यांचे सीमांकन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात येईल आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या रस्त्यांना क्रमांक देऊन त्यांच्या नोंदी गावदप्तरी घेण्यात येतील. १७ सप्टेंबरपासून पाणंद रस्त्यांवर वृक्षारोपणही केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे हक्काने दिली जाईल. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमांनुसार नियमित केली जातील आणि धारकांना पट्टे वाटप केले जातील.
तिसऱ्या टप्प्यात ‘आदिसेतू’अभियानांतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरे आयोजित केली जातील. तसेच ‘जिवंत सात बारा’ मोहिमेअंतर्गत मयत व्यक्तीचे नाव कमी करून वारसाचे नाव लावणे आणि सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी करण्याची कामेही केली जातील.

