– महिनाभर विविध विभागांच्या सेवा मोहिमा; अभियानाच्या वाहनाला हिरवी झेंडी
– वनहक्कधारकांच्या अभिलेख अद्ययावतीकरणासह विद्यार्थ्यांचे आवश्यक दाखले पूर्ण करण्यावर भर
गडचिरोली :- नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्रभावीपणे आणि वेळेत मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ आज शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी अभियानाच्या जनजागृती वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोळकर, सहायक प्रकल्प अधिकारी वाहिद शेख, सहायक प्रकल्प अधिकारी देविदास टिंगुसले, मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले की, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पुढील एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या महत्त्वाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. आदिवासी विकास, महसूल, ग्रामविकास, क्रीडा, सांस्कृतिक, ऊर्जा यासह विविध विभागांनी आपापल्या विभागाशी संबंधित महत्त्वाच्या सेवा व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.

वनहक्कधारकांच्या अभिलेख अद्ययावतीकरणाला गती
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या अभियानात काही महत्त्वपूर्ण मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी सांगितले. वनहक्क पट्टे प्राप्त लाभार्थ्यांच्या महसूल अभिलेखांतील आवश्यक नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया अभियान कालावधीत युद्धपातळीवर राबविण्यात येईल. वनहक्क पट्टा आणि महसूल अभिलेखातील क्षेत्रामध्ये तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी महसूल विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ, नुकसानभरपाई तसेच अन्य पात्र सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे आवश्यक दाखले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवा, शिष्यवृत्ती आणि योजनांचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्रांअभावी अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे जन्म दाखले, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच आधार अद्ययावतीकरणासह आवश्यक कागदपत्रांची प्रलंबित प्रकरणे अभियान कालावधीत पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. आवश्यक दस्तऐवजांअभावी एकही पात्र विद्यार्थी शासकीय सेवेपासून वंचित राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.
आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लियस बजेटअंतर्गत योजना, कौशल्य विकास योजना तसेच राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. राणी दुर्गावती महिला बचत गट सक्षमीकरण योजनेसह विविध योजनांच्या प्रमुख बाबींची व्यापक जनजागृती करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आश्रमशाळा व वसतिगृहांच्या सुविधांचे सर्वेक्षण
आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा सर्वंकष आणि पारदर्शक पद्धतीने आढावा घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणातून निदर्शनास येणाऱ्या आवश्यक बाबींवर प्राधान्याने उपाययोजना करून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, रांगोळी व अन्य क्षेत्रांतील गुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी विशेष मेळावे, स्पर्धा आणि उपक्रम आयोजित करण्यात येतील. जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असेही जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.

सेवाभावातून समाजासाठी योगदान द्या – ॲड. प्रणोती निंबोळकर
नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध सेवा पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या संकल्पनेतून राष्ट्रसेवेला प्राधान्य दिले असून, प्रत्येकाने सेवाभावातून समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
रक्तदान, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गरजूंना मदत तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक समाजासाठी योगदान देऊ शकतो. शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या पात्र घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे ॲड. निंबोळकर यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी विविध सामाजिक व जनजागृतीपर विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. या रांगोळ्यांच्या माध्यमातून सेवा, सामाजिक जबाबदारी आणि जनकल्याणाचा संदेश देण्यात आला.
सामूहिक वनहक्क समित्यांना धनादेशांचे वितरण
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन समित्यांना विविध कामांसाठी धनादेशांचे वितरण करण्यात आले. सावेला, मारंदा, कन्हाळगाव, कोसमघाट, सुईमारा, केळीगट्टा आणि रायपूर ग्रामसभांना रोपवाटिका उपक्रमासाठी धनादेश वितरित करण्यात आले. तसेच कन्हाळगाव, सुईमारा आणि रायपूर ग्रामसभांना सिमेंट बंधारा बांधकामासाठी धनादेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सेवा संकल्प अभियानांतर्गत आगामी महिनाभर राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा व उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.





