spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्रात युरिया खताचा तीव्र तुटवडा; अकोटमध्ये शेतकऱ्यांची रात्रभर धावपळ

– युरियासाठी कृषी केंद्राबाहेर शेतकऱ्यांची गर्दी; परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त

अकोला :- खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत असून अकोला जिल्ह्यातील अकोट येथे युरियासाठी अक्षरशः हाहाकार उडाल्याचे चित्र दिसून आले. युरिया मिळवण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांबाहेर रात्रभर मुक्काम ठोकला. बुधवारी सकाळी दुकाने उघडताच खत खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली. वाढती गर्दी आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला.

पहाटे तीनपासून रांगा; नंबर लागेल की नाही याची चिंता

खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेले युरिया खत मिळावे यासाठी शेतकरी पहाटे तीन वाजल्यापासूनच कृषी बाजारपेठ परिसरात रांगेत उभे होते. अनेकांनी रात्रीपासूनच कृषी केंद्रांसमोर मुक्काम केला होता. खताचा मर्यादित साठा आणि वाढती मागणी यामुळे प्रत्येकाला आपला नंबर लागेल की नाही, याची चिंता सतावत होती.

वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत रांगेत सहभाग

युरियाच्या टंचाईचे गांभीर्य यावरून स्पष्ट होते की, ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांपासून ते शेतकरी कुटुंबातील लहान मुलांपर्यंत अनेकजण रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्रभर जागरण करूनही शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था किंवा इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार अनेकांनी केली.

रांगेत वाद; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

रांगेतील क्रमांकावरून काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचेही दिसून आले. दोन दिवसांपूर्वीही अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळीही पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : सरकार संवेदनशील आहे का?

स्वतःला शेतकऱ्यांचे सरकार म्हणवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी खत पुरवठ्याबाबत प्रभावी उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना खतासाठी रात्रभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने कृषी व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

कृषी व्यावसायिकांकडून नाश्त्याची व्यवस्था

दरम्यान, या संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीत काही कृषी केंद्र चालकांनी सामाजिक बांधिलकी जपत रांगेत उभ्या शेतकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली. सकाळी शेतकऱ्यांना पोहे आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे तासन्तास प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यातील अनेक भागांत युरिया खताची मागणी वाढत असताना पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. अन्यथा खरीप हंगामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.