– प्रकल्प अधिकारी साकोली यांच्याकडे तक्रार दाखल; स्थानिक उमेदवारांना डावलण्याचा प्रयत्न?
हंसराज, प्रतिनिधी भंडारा साकोली :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प साकोली अंतर्गत येत असलेल्या वडेगांव ग्रामपंचायतीमधील शंकरपूर (वॉर्ड क्र. ३) येथील मिनी अंगणवाडी केंद्रात मदतनीस पदभरती प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पदभरतीमध्ये नियमांचे उल्लंघन करून परगावच्या उमेदवारांना सामावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शंकरपूर येथील समस्त ग्रामस्थांनी ता. 13/1/2026 प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे यांच्याकडे धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये शंकरपूर येथील मिनी अंगणवाडी केंद्रासाठी मदतनीस पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही भरती केवळ शंकरपूर येथील स्थानिक रहिवाशांसाठीच असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. तसे पत्रही गावात प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, मार्च २०२५ मध्ये जेव्हा प्राथमिक पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली, तेव्हा त्यात वडेगांव येथील दोन उमेदवारांची नावे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वडेगांव ही मोठी ग्रामपंचायत असून शंकरपूर हा त्याचाच एक भाग (वॉर्ड क्र. ३) आहे. नियमानुसार मिनी अंगणवाडी ज्या वॉर्डात किंवा वस्तीत आहे, तिथल्याच स्थानिक उमेदवाराला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. जाहिरात प्रसिद्ध होताना केवळ शंकरपूरच्या रहिवाशांनी अर्ज करावे असे सांगण्यात आले होते. परंतु, सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या वडेगांव येथील दोन उमेदवारांनी नियमांचे उल्लंघन करून या प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे.
हा एक प्रकारचा प्रशासकीय घोटाळा असून पात्र स्थानिक उमेदवारांवर अन्याय करण्याचा हा प्रकार असल्याचे शंकरपूरवासीयांचे म्हणणे आहे. या संदर्भात समस्त ग्रामस्थांनी संघटित होऊन साकोली येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमबाह्य अर्ज रद्द करावेत आणि केवळ शंकरपूर येथील स्थानिक उमेदवारांचीच नियमानुसार निवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आता या प्रकरणावर प्रकल्प अधिकारी काय भूमिका घेतात आणि स्थानिक महिलांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




