– निर्मल नगरीत आषाढी एकादशी निमित्ताने भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन
नागपूर :- उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन सेवा ट्रस्टतर्फे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शनिवार, २५ जुलै रोजी, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भव्य धार्मिक सोहळा आणि आकर्षक फळे व फुलांच्या सजावटीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात सुमारे १००० किलो, ताजी फळे आणि विविधरंगी फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली असून, या देखण्या सजावटीमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने नटला आहे. फळे, फुले आणि धार्मिक कलाकुसरीच्या संगमातून साकारलेली ही सजावट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. यावेळी सकाळी ११ वाजता. महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणी व संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन महाआरतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. “माऊली” हा शब्द उच्चारताच भक्तांच्या अंतःकरणात प्रेम, श्रद्धा आणि भक्तिभाव जागृत होतो. याच भक्तीभावातून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा सर्व भक्तांसाठी आध्यात्मिक आनंदाचा आणि प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.





