Ø जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
यवतमाळ :- उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांकडून नवागत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या ‘शाळा प्रवेशोत्सव’ समारंभनिमित्त जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळमधील गोधणी रोड येथील जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक विद्यालय येथे भेट देवून विद्यार्थ्यांना फुलपुष्प देवून स्वागत केले. तसेच त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले. या शाळेतील 1975 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून बारावीच्या कॉमर्स सायन्स तसेच उर्दू मधील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपये रोख तसेच दहावीच्या उर्दू मराठी विभागातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांसाठीच्या योजना, सुविधा, जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शाळेतील सुविधांची पाहणी करून उपाययोजनात्मक सूचना केल्या. तसेच वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, प्राथमिकच्या उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद कांबळे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, माजी विद्यार्थी अरुण सरागे, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र जोगमोडे,पालक उपस्थित होते.
चिचबर्डी येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देवून ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला. दरम्यान यवतमाळ तालुक्यातील चिचबर्डी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांच्या उपस्थितीत ‘शाळा प्रवेशोत्सव’ समारंभ पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका संगीता चनेकर, लिपीक विजय राठोड यांच्यासह शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते.स्थित होते.




