किशोर साहू, मौदा ,ता. १७ :- मौदा तालुक्यातील मांगली (तेली) , बोरी(घिवारी) सह इतरही ग्रामपंचायत मध्ये आज बुधवार (दि. १७ सप्टेंबर) ला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत मुख्यमंत्र्यांचे संबोधन हे थेट टीव्ही स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे. या ग्रामसभेत ग्रामपंचायत येथील विविध गटांची अधिकृत स्थापना व जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ही सभा प्रत्येक गावासाठी अत्यंत महत्त्वाची व ऐतिहासिक असल्याचे सोशल मीडियावरील स्टेटसवर ग्रामसभेबद्दल माहिती ठेवून तालुक्यातील सरपंच मंडळीकडून सांगण्यात येत आहे.
या ग्रामसभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका ,सेविका, बचत गट पशुवैद्यकीय अधिकारी, पशु सखी, कृषी सेवक, भजन मंडळ ,महिला ग्राम संघ व इतर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी या ग्रामसभेला समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आव्हान मांगली (तेली) येथील सरपंचा निशा रवींद्र फटिंग, उपसरपंचा मोनू कवडू साठवणे, ग्रामपंचायत अधिकारी आय एस वंजारी, बोरी ( घिवारी) सरपंच व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विशाल सेलोकर, उपसरपंच दिनेश पटले,ग्रामपंचायत अधिकारी वैभव बावनकर सह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीतील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



