spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘पल्स वैद्यकीय परिषद’निमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विशेष मुलाखत

मुंबई :- मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 आणि 28 मार्च 2026 रोजी ‘पल्स वैद्यकीय परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. परिषदेच्या आयोजनाची उद्दिष्टे, नियोजन आणि अंमलबजावणी याविषयी या मुलाखतीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 17 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार 18, गुरुवार आणि शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका सुषमा जाधव यांनी केले आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणारी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील धोरणात्मक परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, डीन, तज्ज्ञ डॉक्टर, खाजगी वैद्यकीय शिक्षण संस्था, आधुनिक वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. यामुळे राज्यातील मेडिकल टुरिझम, संशोधन, औषधनिर्मिती उद्योग आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य मिळणार आहे. ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता ठोस निर्णय, गुंतवणूक करार, धोरणात्मक बदल आणि जनतेसाठी प्रत्यक्ष फायदे निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री मिसाळ यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये संवाद साधतांना व्यक्त केला आहे.

या विशेष मुलाखतीतून ‘पल्स वैद्यकीय परिषद’ राज्याच्या आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीसाठी कशाप्रकारे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.