कामठी :- भारत निवडणूक आयोग यांच्या मार्फत आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या विशेष पुननिरीक्षण कार्यक्रम (SIR) च्या 58-कामठी विधानसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या 524 मतदान केंद्रावर प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मौदा संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय कामठी येथे सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत कामठी विधानसभा मतदार यादी अद्यावत करण्याच्या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना देत या राष्ट्रीय कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ईशारा एसडीओ संजय पवार यांनी दिला.तसेच बैठकीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी यांनी (SIR) च्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना कार्यान्वीत करणे, सर्व विभागामार्फत नोडल अधिकारी यांची नेमणुक करणे, बी.एल.ओ. यांना मदतीकरीता स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांची टिम उपलब्ध करुन देणे, राजकिय पक्षासोबत समन्वयाने काम करणे इत्यादी बाबत महत्वाच्या सुचना देण्यात आल्या.
सदर बैठकीला कामठी तहसिलदार गणेश जगदाळे,, मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, नायब तहसीलदार मयुर चौधरी, मुख्याधिकारी, नगर पंचायत बिडगाव विनायक घुगे, मुख्याधिकारी, महादुला अमर हांडा तसेच इतर विभागाचे अधिकारी/कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संजय पवार म्हणाले की मतदार यादीचे काम हे अत्यंत महत्वाचे राष्ट्रीय कार्य असून ते विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. मतदार मॅपिंग,व मतदारांचे ब्लर फोटो गोळा करून अद्यावत करणे,मतदारांची डीएसई नोंद पडताळणी करणे,मयत स्थलांतरीत,विवाहित मतदारांची अचूक नोंद करणे,कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांनी बीएलओ यांना सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले व संबंधित बीएलओ ने अधिक गतीने व प्रभावीपणे काम पूर्ण करावे असे निर्देश देण्यात आले.



