spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त चार दिवसीय जनसेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (दक्षिण नागपूर) च्यावतीने लोकनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त २२ ते २५ जुलै या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय जनसेवा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत हजारो नागरिकांना लाभ देण्यात आला. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच ९० बालकांचे आधार अपडेट, ८८ विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक नोंदणी, १६० विद्यार्थ्यांची अर्धतिकीट कार्ड प्रक्रिया, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसह ३८७ नागरिकांची आभा कार्ड नोंदणी करण्यात आली. याशिवाय श्रम कार्ड, मतदान ओळखपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, बांधकाम कामगार कार्ड आदी विविध योजनांसाठी ४३२ नागरिकांची नोंदणी करण्यात आली. या चार दिवसांच्या शिबिराचा एकूण हजारो नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराच्या समारोपप्रसंगी आयोजकांनी लोकनेते अजितदादा पवार यांच्या जनहितवादी विचारसरणीचा वारसा पुढे नेत समाजहितासाठी कार्य सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या जनसेवा शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजा टाकसाळे, सभापती राजु नागुलवार, महिला अध्यक्षा रुपाली पिचकाटे, भोला पटेल, राजेश समर्थ, भूषण हरडे, नितीन ढेंगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार दिवसीय जनसेवा शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अखिलेश भुगावकर, विश्वास सेलसुरकर, रमेश कांबळे, नामदेव देशकर, राजेंद्र बालपांडे तसेच सर्व सहकारी, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांचे आभार दक्षिण नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मुकेश रेवतकर यांनी मानले. त्यांनी यापुढेही जनतेच्या सेवेसाठी अशाच उपक्रमांचे आयोजन करण्याची ग्वाही दिली.

Popular Articles