spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पावसाअभावी अंकुरलेली रोपे धोक्यात; उष्णतेचा खरीप पिकांवर वाढता फटका

कामठी :- कामठी तालुक्यात खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी त्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने अंकुरलेली पिके धोक्यात आली आहेत. सततची उष्णता, दमट वातावरण आणि जमिनीतील घटता ओलावा यामुळे कापूस, सोयाबीन, आदी पिकांच्या वाढीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

जून महिन्यात झालेल्या प्रारंभीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला असून अनेक ठिकाणी कापसाची रोपे पिवळी पडू लागली आहेत, तर काही भागांत कोवळी रोपे करपू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात कापूस व इतर खरीप पिकांना रासायनिक खतांचा पहिला डोस देण्याचे नियोजन असले तरी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास खतांचा अपेक्षित परिणाम होणार नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करूनच खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.

दरम्यान, सततच्या उष्णतेमुळे विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांतील पाण्याची पातळीही घटू लागली आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनाही पाण्याचे नियोजन करणे आव्हानात्मक ठरत आहे. लांबलेला पाऊस कापूस व इतर खरीप पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य आता पूर्णपणे पावसावर अवलंबून असून, येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास पिकांना नवसंजीवनी मिळू शकते. अन्यथा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Popular Articles