संत्रा फळ पिक विम्याचे ट्रिगर जाहीर करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालकांना निवेदन ! 

0
20

– राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा !

– ट्रिगर जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामागे विमा कंपनीला फायदा करून देण्याचा डाव? – रुपेश वाळके

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- 2025 – 26 चा हवामानावर आधारित आंबिया बहार संत्रा फळ पिक विम्याचे ट्रिगर जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे अमरावती जिल्ह्यातील लाखो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, यांच्या नेतृत्वाखाली विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांना निवेदन देऊन फळ पिक विम्याचे ट्रिगर तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ३१ मे रोजी आंबिया बहार संत्रा फळ पिक विम्याचा कालावधी संपला, तर शासनाच्या नियमांनुसार ४५ दिवसांच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, 46 दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप ट्रिगर जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असून, ट्रिगरमध्ये फेरफार करून विमा कंपनीला आर्थिक फायदा करून देण्यासाठी जाणूनबुजून विलंब केला जात आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रुपेश वाळके यांनी निवेदनात म्हटले आहे की, संत्रा उत्पादक शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना शासन आणि विमा कंपनीची ही दिरंगाई अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा यासाठी ट्रिगर तातडीने जाहीर करून विमा भरपाई त्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच या प्रक्रियेत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी. अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा फळ पिक विमा रोखणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशारा कृषी संचालकांना निवेदन देऊन देण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, नरेंद्र नांदुरकर, जीवन होले, अंकुश कोल्हे, शयाम कडू यांच्यासह आदी संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागला ८ दिवसांचा अल्टिमेटम !  

८ दिवसांत संत्रा फळ पिक विम्याचे ट्रिगर जाहीर करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा मदत जमा न झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन, कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीची राहील

– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.