spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

टोल नाक्यांवरील थांबा इतिहासजमा होणार, गडकरींचे सुतोवाच

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायम त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात, पण त्याचवेळी त्यांच्या घोषणदेखील तेवढ्याच चर्चेत असतात. आता नुकतेच गुरुवारी त्यांनी राज्यसभेत टोलनाक्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा दिला आहे. त्यांनी एक अशी प्रणाली कार्यान्वित करण्याचे ठरवले आहे, ज्यामुळे वाहनांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही आणि त्यांचा प्रवास आणखी सुखकर होईल. त्यांच्या वक्तव्याप्रमाणे त्यांच्या घोषणदेखील चर्चेचा विषय ठरत असल्याने ही घोषणा खरेच कार्यान्वित होणार का, हे त्यांनी दिलेल्या डेडलाईन लाच कळणार आहे.

देशातील महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहनचालकांना होणारा वेळेचा अपव्यय लवकरच संपुष्टात येणार असून, २०२६ च्या अखेरीस देशभरात मल्टी-लेन सीमलेस फ्री-फ्लो टोल (MLFF) प्रणाली पूर्णतः अंमलात आणली जाईल, अशी माहिती रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर टोल प्लाझांवर वाहनांना थांबावे लागणार नाही, असा दावा त्यांनी केला.

गडकरी यांनी सांगितले की, MLFF ही अत्याधुनिक एआय-आधारित टोल प्रणाली असून, सॅटेलाइट तंत्रज्ञान, वाहन क्रमांक ओळख (नंबर प्लेट रेकग्निशन) आणि फास्टॅग यांचा समन्वय यात असेल. सध्या फास्टॅग मुळे टोल भरण्याचा वेळ ६० सेकंदांपर्यंत कमी झाला आहे. मात्र, नव्या प्रणालीत हा वेळ शून्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. MLFF प्रणाली लागू झाल्यानंतर कार टोल नाका ८० किलोमीटर प्रतितास वेगाने थेट पार करू शकतील आणि कोणत्याही वाहनाला थांबवले जाणार नाही.

या नव्या तंत्रज्ञानामुळे देशपातळीवर मोठ्या प्रमाणात इंधन बचत होणार असून, अंदाजे १,५०० कोटी रुपयांची इंधन बचत अपेक्षित आहे. त्याचबरोबर टोल व्यवस्थेत पारदर्शकता वाढून टोल चुकवेगिरीला आळा बसेल. परिणामी, सरकारी महसुलात सुमारे सहा हजार कोटी रुपयांची वाढ होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

“पूर्वी टोल भरण्यासाठी तीन ते दहा मिनिटे लागत होती. फास्टॅग मुळे केवळ वेळच वाचला नाही, तर महसुलात किमान पाच हजार कोटी रुपयांची वाढ झाली. आता MLFF मुळे टोल व्यवस्थेत कोणतीही अडचण राहणार नाही, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

२०२६ पर्यंत ही प्रणाली १०० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र सरकारने व्यक्त केला असून, यानंतर देशातील महामार्गांवरील टोल प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित होणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.