– IMPF नागपूरतर्फे जनजागृती सत्र संपन्न
नागपूर :- इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशन (IMPF) नागपूरच्या वतीने अंजुमन इंग्लिश प्रायमरी स्कूल, सदर येथे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी “स्मार्टफोनचा योग्य वापर : मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे आणि अभ्यासावर लक्ष कसे केंद्रित करावे” या विषयावर एक तासाचे जनजागृती सत्र उत्साहात पार पडले. या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिनेश आर. सरोज (डेव्हलपमेंटल अँड बिहेव्हियरल पीडियाट्रिशियन, ऑटिझम अँड चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर) यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अभ्यास, वर्तन आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी डिजिटल माध्यमांचा संतुलित वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला. सत्रादरम्यान मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाग्रता कशी कमी होते, स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पाच प्रभावी उपाय, अभ्यासाच्या चांगल्या सवयी कशा विकसित कराव्यात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही डॉ. सरोज यांनी दिली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. युवा पिढीत आरोग्यदायी डिजिटल सवयी रुजाव्यात आणि मोबाईल व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IMPF नागपूर यांनी अंजुमन प्रायमरी स्कूल, सदर तसेच डॉ. दिनेश आर. सरोज यांचे आभार मानले.



