अमरदिप बडगे, तिरोडा १६ :- तालुक्यातील नवेझरी परिसरात खरीप हंगामातील सन 2024- 2025 चा धानाच्या बोनस अडकल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले होते .
अशावेळी प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर व शेतकऱ्यांनी 1 ऑगस्ट रोजी नवेझरी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनस्थळी गोंदिया येथील पणन अधिकारी विवेक इंगळे, तिरोडा तहसीलदार ठाकरे तिरोडा पोलीस ठाणेदार अमीत वानखेडे यांनी भेट दिली होती. सात दिवसाच्या आत धानाचे बोनस शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा होण्याचे आश्वासन पणन अधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत 125 शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप हंगामातील धान्यांची बोनस ची रक्कम खात्यात जमा झाल्याची माहिती प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिली. खात्यात बोनसची रक्कम जमा झाल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष आभार मानले आहे.




