खापा, वार्ताहर :- राष्ट्रीय महामार्ग सावनेर – मनसर मार्गावरील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोथुरना जवळ ट्रक पलटी होऊन गंभीर अपघात झाला. ही घटना शनिवार दि. १६ मे रोजी दुपारी एक वाजता दरम्यान घडली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात चालक व क्लिनर दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन क्र. एम पी ०९ एच एच ३८६१ हा ट्रक सोयाबीनच्या बॅग भरून रामटेकच्या दिशेने जात असताना कोथुरना येथील पशू वैद्यकीय दवाखान्यासमोर असलेल्या वळण रस्त्यावर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन गंभीर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या समोरील कॅबिन मध्ये चालक व क्लिनर दोघेही दबून गेले होते. चालक मुरली मोतीलाल कुमरे (वय ३४ वर्षे) रा. लालखेडी, देवास, मध्यप्रदेश, क्लीनर जीवन जब्बर सिंग, रा. लोहारदा, देवास, मध्यप्रदेश असे नाव आहे. यांची ओळख पटली असून, ट्रक मालक व नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.![]()
या घटनेची माहिती, स्थानिक नागरिक भागवत निस्ताने यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. हितेश बनसोड यांनी तात्काळ खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांना माहिती दिली. माहिती मिळताच खापा पोलीस, महामार्ग पोलीस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.
खापा पोलीस, महामार्ग पोलिस, गावकरी तसेच हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड व टीम मेंबर राजा फुले, आर्यन कातकडे यांच्या मदतीने अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने दोन्ही मृतदेह दुपारी चार वाजता दरम्यान बाहेर काढण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक मधून चालक व क्लिनरला बाहेर काढण्याकरिता स्थानिक नागरिक दीपक बिहोने, शैलेश बिहोने, दारासिंग पाटील, गौरव डाखोळे, शुभम शोधले, भागवत निस्ताने, नितेश उईके, पंकज चौहान यांनी महत्त्वाची मदत केली.
पोलिसांनी पंचनामा करून दोघांनाही हितज्योती आधार फाउंडेशनच्या ॲम्बुलन्सने शासकीय रुग्णालय, सावनेर येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता रवाना करण्यात आले.
सायंकाळ झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले नाही. प्राथमिक तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पी. एस. आई. मयुर डोंगरे, पोलिस शिपाई नितेश चिपडे यांनी केला. पुढील तपास खापा पोलिस करीत आहेत.
“गतिवरोधक लावण्याची मागणी”
सदर वळण रस्ता हा धोकादायक असून, या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात. भरधाव वाहनांचे या वळणावर नियंत्रण न राहिल्याने असे अपघात होत असतात. या ठिकाणी गतिअवरोधक बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड व स्थानिक नागरिकांनी केली आहे. जेणेकरून भविष्यात अश्या होणाऱ्या घटनांवर आळा बसेल.