– ठाणा पेट्रोल पंपाजवळील घटना; चालकाच्या निष्काळजीपणामुळे ओढवला प्रसंग
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH 53) ठाणा पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी १०:१५ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप गाडी भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्ते दुभाजकाला (डिवायडर) जाऊन धडकली. या अपघातात गाडीत बसलेल्या १९ महिला मजूर जखमी झाल्या असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक MH 40/DC-1981) मजुरांना घेऊन कामावर जात होती. मोहदुरा येथील रहिवासी असलेला चालक राहुल प्रकाश लिचडे (२८) हा गाडी अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. ठाणा पेट्रोल पंपाजवळ गाडीचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकाला धडकली. धडक इतकी जोरात होती की, गाडीतील महिलांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली.
१९ महिला जखमी; गोपेवाडा गावात शोककळा
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये प्रामुख्याने गोपेवाडा येथील १७ आणि शहापूर येथील २ महिलांचा समावेश आहे. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: शारदा ठवकर (३०), जसुदा गोंधुळे (७०), सुनिता सपाटे (६५), शारदा मेश्राम (३५), शीला वैद्य (६५), बेबीबाई श्रीरंग (५७), विद्या टांगले (३७), वंचळा मारबते (३५), शिला धोतरे (३२), सुमत्रा धोतरे (७०), सिंधु वैद्य (६५), रेखा गेडाम (४७), कांता तिजारे (६५), लता तिजारे (५०), शिला बोंदरे (४०), शिल्पा बोंदरे (४०), सुनिता तिजारे (५५), रिना हारगुडे (३५) आणि शांता भोंदे (६०).
याप्रकरणी गोपेवाडा येथील अनिता इंदेश्वर धोतरे (४०) यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चालक राहुल लिचडे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) सहकलम १८४ मो. वा. का. आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंगाडे करत आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.








