– रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संघर्ष, रिक्षांच्या रांगा तसेच भाड्याबाबतची अनिश्चितता दूर करून प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला. स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ, ठाणे आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील पहिलाच उपक्रम ठाणे रेल्वे स्थानक येथे सुरु करण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रीपेड रिक्षास्टँड व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत, युनियनचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांच्या रांगा, रिक्षाचालकांमधील होणारे वाद तसेच प्रवाशांशी निर्माण होणारे संघर्ष टाळण्यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी विविध पातळ्यांवर सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीदरम्यान विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. रिक्षाचालक दिवसभर कष्ट करून मिळवलेले उत्पन्न त्याचदिवशी आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी घरी घेऊन जात असल्याने त्याच्या दैनंदिन कमाईचा व्यवहार लक्षात घेऊन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आले. या उपक्रमाला तातडीने मान्यता देऊन ठाणेकर नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आ. निरंजन डावखरे यांनी विशेष आभार मानले.
‘सकाळपासून दिवसभर केलेल्या व्यवसायाचा संपूर्ण हिशेब संध्याकाळी घरी जाताना रिक्षाचालकाच्या बँक खात्यात जमा होईल. सर्व रिक्षाचालकांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जाणार असल्याने त्यांच्या कुटुंबालाही याचा मोठा फायदा होईल,” असे सांगत आ. डावखरे यांनी यावेळी सिटीफ्लोचेही आभार मानले. प्रीपेड रिक्षा सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीच निश्चित भाड्याची माहिती मिळणार असल्याने भाड्याबाबतची अनिश्चितता दूर होणार आहे. परिणामी प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यातील भाडे किंवा प्रवासासंदर्भातील संभाव्य संघर्ष टाळण्यास या व्यवस्थेची निश्चितच मदत होणार आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने रिक्षा सेवा मिळणार असल्याने रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे आ. डावखरे यांनी नमूद केले.





