– “मनपाच्या व्यवस्थेचा नागरिकांना लाभ”
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीगणेश मूर्तींच्या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार (ता.२०) रोजी सातवा दिवशी नागरिकांनी मनपाद्वारे ४९ ठिकाणी उभारण्यात आलेल्या १३७ कृत्रिम तलावांचा वापर करीत ४ हजार ३०३ मातीच्या आणि २४७ पीओपीच्या, अशा एकूण ४ हजार ५५० श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शहरात टप्प्याटप्प्याने ४१९ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय मोठ्या आकाराच्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज येथील कच्छीविसा आणि कोराडी येथे विशेष मोठ्या कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे यासाठी ग्रीन विजिल फाऊंडेशन सारख्या स्वयंसेवी संस्था तसेच रामदेवबाबा विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
झोननिहाय विसर्जन
लक्ष्मीनगर झोनमध्ये १२ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, सातव्या दिवशी १ हजार २२७ मातीच्या आणि ३२ पीओपीच्या अशा एकूण १ हजार २५९ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये ५९ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून, येथे १ हजार ६९८ मातीच्या आणि ११७ पीओपीच्या अशा एकूण १ हजार ८१५ मूर्तींचे विसर्जन झाले. हनुमाननगर झोनमध्ये १७ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे ५४१ मातीच्या आणि १० पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोनमध्ये ४ कृत्रिम तलावांमध्ये ३१८ मातीच्या आणि ४९ पीओपीच्या अशा एकूण ३६७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नेहरूनगर झोनमध्ये २ कृत्रिम तलावांची व्यवस्था असून येथे ३८६ मातीच्या आणि ३४ पीओपीच्या अशा एकूण ४२० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गांधीबाग झोनमध्ये २२ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे ५ मातीच्या मूर्तींचे विसर्जन झाले. सतरंजीपुरा झोनमध्ये १ कृत्रिम तलावामध्ये ३६ मातीच्या आणि २ पीओपीच्या मूर्तींचे, आशीशीनगर झोन मध्ये २ कृत्रिम तलावामध्ये १२ मातीच्या आणि ३ पीओपीच्या अशा एकूण १५ मूर्तींचे, तर मंगळवारी झोनमधील १७ कृत्रिम तलावांमध्ये ७३ मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या सोबत पोलीस लाईन टाकळी येथे महानगपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात ७ मातीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देत मनपाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर केला असून, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाच्या या उपक्रमाला नागरिकांचा सहभाग मिळत आहे.
विविध संस्थांचे सहकार्य
विसर्जनावेळी नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आणि योग्य माहिती देण्यासाठी ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि रामदेवबाबा विद्यापीठाचे स्वयंसेवक विद्यार्थी यांच्यासह इतर स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवीत आहेत. यात सर्व कौस्तुभ चॅटर्जी, सुरभि जैसवाल, मेहुल कोसुरकर, श्रिया जोगे, प्रिया यादव, तुषार देशमुख, रामदेवबाबा विद्यापीठाचे स्वयंसेवक हार्दिक अग्रवाल, अनुष्का गुरवे, हर्ष जोरा,अमेय शेंडे, अवंती जोशी उपस्थित आहेत.
कृत्रिम तलावाची माहिती आता एका क्लिकवर
नागरिकांना त्यांच्या परिसरातील कृत्रिम विसर्जन तलावाची माहिती सहज मिळावी यासाठी मनपाने क्यूआर कोड आणि डिजिटल मॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. https://ganpati-zone-map.emergent.host या संकेतस्थळावर तसेच क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर झोननिहाय कृत्रिम तलावांची माहिती मिळू शकते. संबंधित तलावापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅप द्वारे दिशादर्शनाची सुविधाही उपलब्ध आहे.
निर्माल्य रथासाठी टोल फ्री नंबर
निर्माल्य रथा संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांसाठी मनपाने 1800 2677 966 हा टोल फ्री लोकांसाठी उपलब्ध केला आहे.





