spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक भीम स्मृती मंडळाची वार्षिक आमसभा उत्साहात

कामठी :- आंबेडकरी चळवळीत सातत्याने सक्रिय राहून सामाजिक बांधिलकीची परंपरा जपण्याच्या उद्देशाने सन १९६७ मध्ये बाबू हरदास एल. एन. चौक, मोटर स्टँड चौक, कामठी येथे स्थापन झालेल्या सार्वजनिक भीम स्मृती मंडळाची वार्षिक आमसभा १५ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली.

मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांसह आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला जातो. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबरला समाजप्रबोधन तसेच कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्याची परंपरा मंडळाने आजतागायत जपली आहे. सामाजिक प्रबोधनाची ही चळवळ अखंडितपणे पुढे नेण्यासाठी मंडळाच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी वार्षिक आमसभा घेण्यात येते.

त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंडळाच्या कार्यालयात अॅड. डी. सी. चहांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंडळाचे अध्यक्ष नागसेन सुखदेवे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी मागील वर्षातील वर्गणी व खर्चाचा लेखाजोखा सभेसमोर सादर करण्यात आला. तसेच आगामी सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, नवनियुक्त कार्यकारिणीने अत्यल्प खर्चात विविध कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून मंडळाच्या बचतीत भर घातल्याबद्दल कार्यकारिणीचे उपस्थितांनी कौतुक केले. मंडळाची सामाजिक व वैचारिक चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी मंडळाचे सचिव सुमित गेडाम, कोषाध्यक्ष भिक्कु भाऊ मेंढे, सहसचिव दिपंकर गणवीर, रोहित महिले, लेखापरीक्षक एस. एस. सहारे गुरुजी, सदस्य सिद्धार्थ गेडाम, महेंद्र कापसे, उमाकांत चिमनकर, सुनील चव्हाण, उदास बन्सोड तसेच सक्रिय सभासद गोविंद वासे, माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी, देवा कांबळे, सुभाष सोमकुवर, वीरेंद्र मेश्राम, दिनेश पाटील, आशिष मेश्राम, आनंद गेडाम, रायभान गजभिये, मनोहर गणवीर, राजेश ढोके, राहुल वासे, सुगत रामटेके,आकाश झोडापे, आदित्य गजभिये, सुमित दुपारे, मंगेश लांजेवार, पुरुषोत्तम नागपुरे, अनिल कुरील, गंगा वंजारी, बबलू रामटेके, आरजू कांबळे आदी उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक सचिव सुमित गेडाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव दिपंकर गणवीर यांनी केले. राष्ट्रगीताने वार्षिक आमसभेची सांगता करण्यात आली.

Popular Articles