साळवा ९ : दिव्यांग बांधवांना शासनाने जाहीर केलेल्या अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी एकता दिव्यांग संघटना, कुही तर्फे जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
शासनाच्या २१ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र दिव्यांगांना अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत नवीन शिधापत्रिका देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात तहसील कार्यालयांतून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. विशेषतः कुही तहसील कार्यालयात संघटनेने सहा वेळा निवेदन दिले असूनही आजपर्यंत अनेक पात्र दिव्यांगांना अंत्योदय कार्ड अथवा इष्टांक मिळालेले नाहीत. त्यामुळे दरमहा मिळणाऱ्या ३५ किलो धान्याच्या लाभापासून ते वंचित राहात आहेत, अशी खंत संघटनेने व्यक्त केली.
संघटनेच्या मागण्या :
जिल्ह्यातील तसेच कुही तालुक्यातील सर्व पात्र दिव्यांगांना स्वतंत्र इष्टांक देऊन त्वरित लाभार्थी म्हणून समाविष्ट करावे.
अंत्योदय कार्ड मिळविण्याची प्रक्रिया सोपी व पारदर्शक करावी.
तहसील कार्यालयांकडून अर्जदारांना तातडीने प्रतिसाद द्यावा.
“दिव्यांग समाज हा सर्वात वंचित घटक असून त्यांना अन्नसुरक्षा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कारवाई करून सर्व पात्र दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा,” अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेश मेश्राम, उपाध्यक्ष सुक्षमा मांढरे यांच्यासह गोंविदा गोमकर, धम्मा गेडाम, राजकुमार फुलझले, संकेत कळंबे, कौशल्या मेश्राम, नंदा डहारे, शामकला मांढरे, माहनंदा सिंदुरकर, वनिता मांढरे, सुनिता श्रीरामे व अन्य दिव्यांग उपस्थित होते




