– पोस्ट व्हायरल झाल्यावर स्पष्टीकरण
नागपूर :- नागपुरात दुचाकीला लागलेल्या आगीवेळी अग्निशमन दलाच्या गाडीत पाणी नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकाऱ्यांनी यावर जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र एकंदरीत या सर्व प्रकारावर आता अग्निशामन दलाने स्पष्टीकरण देत गाडीत पाणी नसल्याचा दावा खोटा असून काही तांत्रिक बिघाडामुळे आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा करणे शक्य झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमधील दाव्यात तथ्य नसल्याचे समोर आलं आहे.
नेमका प्रकार काय?
नागपूरच्या राणी दुर्गावती चौकात एका इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेची तात्काळ माहिती अग्निशामन दलाला देण्यात आली. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे मिनी टेंडर घटनास्थळी पोहोचले. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे गाडीवर पाणी मारण्यास अडचणी आल्या. परिणामी ‘गाडीत पाणीच नसल्याने आग विझवता आली नाही’ असा दावा करणारा एक व्हिडीओ एकाने शूट करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. बघता बघता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओ वस्तुस्थितीला धरून नसून अर्धवट माहितीवर आधारित असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले.
मिनी टेंडरच्या इंजिनमधून पंपला मिळणाऱ्या वीज पुरवठ्याच्या सर्किटचा फ्युज उडाला, म्हणून…
‘मिनी टेंडरच्या इंजिनमधून पंपला मिळणाऱ्या वीज पुरवठ्याच्या सर्किटचा फ्युज उडाल्याने अग्निशमन दलाच्या गाडीचा पंप सुरू होऊ शकला नाही, परिणामी तांत्रिक बिघाडामुळे पंप सुरू होऊ शकला नाही’, असे स्पष्टीकरण अग्निशमन विभागाकडून देण्यात आले, तसेच तातडीने दुसरी मोठी गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. परंतु त्यापूर्वी स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.





