आगामी निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचाच झेंडा बुलंद होईल – जयदीप कवाडे

0
128

– राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा

नागपूर :- आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदाराच्या मनामनात रिपब्लिकन विचारांची मशाल पेटवली जाईल. ही मशाल विझणारी नाही, ती झेंडा बनून उंच फडकणार आहे. हा झेंडा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचाच असेल आणि तो बुलंदपणे सत्तेच्या शिखरावर जाईल. कारण आमची लढाई पदासाठी नाही, तर समतेच्या आणि न्यायाच्या इतिहासासाठी आहे,” अशा जोशपूर्ण शब्दांत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप  जोगेंद्र कवाडे यांनी कार्यकर्त्यांना एकजूट व लढाऊ तयारीचे आवाहन केले.मंगळवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात जयदीप कवाडे यांचा वाढदिवस युवा चेतना दिन म्हणून साजरा करण्यात आले. भव्य सत्कार सोहळयात लॉंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते जयदीप कवाडे यांना शॉल व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी गोपाळराव आटोटे , महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, महाराष्ट्र प्रदेश महासचिव बापूराव गजभारे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रतिमा जयदीप कवाडे (राष्ट्रीय नेत्या, महिला आघाडी), प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय पाटील, नागपूर शहर अध्यक्ष कैलाश बांबोले, नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, विदर्भ प्रदेश संघटक अंकित धुपे, नागपूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पलाश ठवरे, शहर महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा मानवटकर, शहर युवा आघाडी अध्यक्ष सोहेल खान, पूर्व विदर्भ सचिव डेनी सोमंकुवर, महिला आघाडी अध्यक्षा सूचिता कोटांगले, ग्रामीण महिला आघाडी अध्यक्ष सुनीता शेंडे, उत्तर नागपूर अध्यक्ष कुंदन उके, तसेच अजय चव्हाण, दिलीप पाटील, सोपान मानवटकर, शितल बोरकर, संजय खांडेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, बाबासाहेबांचे स्वप्न केवळ वाचनात नाही, तर कृतीत उतरवणे ही आमची जबाबदारी आहे. रिपब्लिकन आत्मसन्मान, दलितांचा सन्मान, महिलांचे स्वातंत्र्य आणि युवकांची क्षमता या चार आधारस्तंभांवर आमची लढाई उभी आहे. पक्षाचा झेंडा प्रत्येक गल्लीबोळात फडकला पाहिजे. आपला झेंडा फक्त ध्वज नाही, तर तो अन्यायाविरुद्धच्या लढाईचे प्रतीक आहे. ही निवडणूक ही केवळ निवडणूक नसून चळवळीच्या भवितव्यासाठीची निर्णायक लढाई आहे. ही वेळ इतिहास रचण्याची आहे. कार्यकर्त्यांनी आता केवळ सभागृहात भाषणे ऐकून थांबायचे नाही, तर समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात जायचे आहे. झोपडपट्टी, शेतमळे, कारखाने, महाविद्यालये प्रत्येक ठिकाणी रिपब्लिकन विचारांचे बी पेरले पाहिजे. हा पक्ष म्हणजे केवळ राजकीय संस्था नाही, तर लाखो पीडितांच्या स्वप्नांचा श्वास आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस व त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांना अद्दल घडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, आगामी निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचाच झेंडा बुलंद होईल. बाबासाहेबांच्या वारशाचा खरा वारसदार हा पीरिपा पक्षच आहे आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर आम्ही भविष्यातील विजयाचा विश्वास ठेवतो. कार्यकर्त्यांकडून मिळालेले प्रेम हाच खरा सत्कार असल्याची भावना जयदीप कवाडे यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

पक्षाच्या मजबूतीसाठी तरुण कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी

यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, ‘रिपब्लिकन’ हा एकमेव राजकीय पर्याय डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे. रिपब्लिकन लोकांना शासनकर्ती जमात बनवण्याची आता हिच ती वेळ आहे. आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीमध्ये समाजाच्या उध्दारासाठी पाच पिढ्यांपासून कवाडे कुटुंबिय समर्पित आहे. हे सर्व करीत असताना इतर राजकीय रंग, चळवळ बघितली. पंरतु, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची रिपब्लिकन ही संकल्पना साकार करण्याचे कार्य पीपल्स रिपब्लिकन पार्टी करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यानिमित्त केले. देशातील आणि राज्यातील युवकांना पक्षात मोठ्या प्रमाणात नेतृत्व देण्यात येणार आहे. पार्टीच्या विस्तार करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी येत्या काळात देण्यात येणार असल्याचेही प्रा. जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले.

सुप्रसिद्ध गायिका पंचशिला भालेराव भीम गीतांद्वारे प्रबोधन

भव्य सत्कार सोहळयात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका व ‘भीमराज की बेटी फेम’ पंचशिला भालेराव यांच्या भीम गीतांचे कार्यक्रमाने परिसर दणानून सोडला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विदर्भासह नागपूर जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मंगळवारी वाढदिवसानिमित्त पीरिपातर्फे ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड,दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे शहरातील विविध अनाथालय, रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवाय सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.