spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे..

अत्याधुनिक संगीत संयोजनातून स्वरबद्ध झालेली संघ प्रार्थना आणि तिचा विविध भारतीय भाषांमधील अर्थ निवेदन करणाऱ्या अभिनव ध्वनिचित्रफितीचा लोकार्पण सोहळा 27 सप्टेंबरला नागपुरात परमपूजनीय सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे हस्ते संपन्न होतो आहे. प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे,प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, निवेदक हरीश भिमानी यांचा या निर्मितीत सहभाग आहे. शताब्दी वर्षात प्रवेश करीत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीत प्रत्येक कार्यक्रमात,दैनिक शाखेत म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेचे अनन्यसाधारण महत्व आहे. डॉ. हेडगेवारांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या आणि मूळ सैद्धांतिक भूमिका कायम ठेऊन कार्यपद्धतीत कालसुसंगत बदल स्वीकारत गेलेल्या संघाची अनेक वैशिष्ट्य आहेत.शताब्दीच्या निमित्ताने त्या विविधांगी वैशिष्ट्यांची चर्चा होईलच. पण संघाच्या कार्यपद्धतीचे एक सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, अतिशय मोठा आशय अगदी सहजपणे स्वयंसेवकांच्या अंतःकरणात रुजवणारे, वरकरणी सामान्य वाटणारे अदभुत आचारतंत्र.

दैनिक शाखेतील अतिशय सध्या वाटणाऱ्या कार्यक्रमातून, नित्य नैमित्तिक आचारातून लाखो स्वयंसेवकांचे जीवन उजळून निघाले आहे. या साऱ्या आचारातून सहजपणे रुजवल्या जाणारा राष्ट्रभक्तीचा, एकत्वाचा, सेवेचा, समरसतेचा, समर्पणाचा आणि वीरव्रताचा भाव, हे संघ स्कूल ऑफ थॉटचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे. साधे गीतांचे उदाहरण घ्या. संघात सांघिक गीत म्हटले जाते. गाणारे सारेच गायक नसतात. पण हे विभिन्न स्वर सांघिक झाले की मनेही आपोआप सांघिक होतात. गाणाऱ्या प्रत्येकाचा स्वर वस्तुतः विविध पट्टीचा, पद्धतीचा आणि गुणवत्तेचा. पण समूह गायनात तेच विसंवादी स्वर आपोआप एकमेकांशी संवादी होऊन अद्वैती वेणुनाद करू लागतात. “प्रेरणा के इन स्वरोमे एक स्वर मेरा मिलालो”, ही असोशी मनामनात जागी होते. संघ शाखेत म्हंटल्या जाणारी ही गीते केवळ गळ्यांवरचा नव्हे तर मन, मेंदू आणि मनगटावरचाही संस्कार असतो. ते केवळ घटकाभरचे रंजन नसते, ते जीवनभराचे प्रबोधन असते. चित्त आणि वृत्ती यांच्या शुद्धीकरणाचे संस्कारसुक्त असते.

जे गीतांचे तेच संघ शाखेत रोज म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेचे. सामान्यतः शाखेच्या कालावधीत सर्वात शेवटी प्रार्थना म्हटली जाते. ती रीड फॉलो स्वरूपात असते. एक जण सांगतो. बाकी सारे सामूहिक पुनरुच्चार करतात. परम पवित्र भगव्या ध्वजासमोर म्हटली जाणारी धीरगंभीर स्वरातील प्रार्थना एकाचवेळी भारतमातेची आर्द्र आळवणी आणि स्वयंसेवक म्हणून स्वयंस्वीकृत संकल्पाची, ध्येयाची सजग उजळणी असते. प्रार्थनेत काय नाही ? संघकार्याचे सारे चिंतन,मनन,प्रयोजन आणि संकल्पन प्रार्थनेतून प्रगट होते. मातृभूमीच्या अथांग प्रेमाने आणि एका अदम्य ध्येयासक्तीने हृदयाकाश लखलखते. आधुनिक मानसशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्रही आताशा थीम साँगचा आग्रह धरायला लागलं आहे. इन्स्टिट्युशन साँग हा कॉर्पोरेट जगताचा परवलीचा शब्द झाला आहे. जगाला जे आज कळतंय, ते तब्बल शंभर वर्षांपासून आपल्या दैनिक कार्यपद्धतीत अंतर्भूत करणारी संघ नावाची जगण्याची रीत किती अद्भुत !

संघाची स्थापना एका बैठकीत झाली तरी त्याच्या कार्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली ती बाल,तरुणांच्या एकत्रित खेळण्यातून.या एकत्रीकरणाने पुढे शाखेचे स्वरूप घेतले.शाखेची पद्धत,कार्यक्रम हळूहळू विकसित होत गेले.या एकूण कार्यपद्धतीचा,त्यातील विविध पैलूंचा अतिशय सूक्ष्म,शास्त्रीय आणि साक्षेपी विचार डॉक्टर हेडगेवारांनी केला होता.आवश्यकतेनुरूप त्यात योग्य तो बदलही केला.सुदृढ शरीरासोबतच मनाच्या पावित्र्याचीही जडणघडण व्हावी,हा डॉक्टरांचा कटाक्ष होता.मन चंगा तो कटौतीमे गंगा ! मनावरील संस्कारांसाठी नित्य प्रार्थना प्रभावी उपकरण आहे,हे त्यांना ठाऊक होते.

त्यामुळे शाखेच्या दैनिक कार्यक्रमात त्यांनी आवर्जून प्रार्थनेचा अंतर्भाव केला.

संघात सुरुवातीला म्हटली जाणारी प्रार्थना मराठी आणि हिंदी अशी संमिश्र होती. संघाच्या या पहिल्या प्रार्थनेचे जनक,डॉक्टर हेडगेवारांचे निकट सहकारी अण्णा सोहनी होते,असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

एक मराठी श्लोक त्याकाळी काही शाळांमध्ये प्रचलित प्रार्थनेतील होता.तो असा –

“नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी

नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी।

नमो धर्मभूमी जियेच्याच कामी

पडो देह माझा सदा ती नमी मी ।।”

याला जोडून तत्कालीन आर्यसमाजात रूढ असणाऱ्या प्रार्थनेत थोडा बदल करून दुसरा श्लोक होता.

“हे गुरो श्रीरामदूता, शील हमको दी जिये।

शीघ्र सारे सद्‌गुणोंसे पूर्ण हिन्दू की जिये।

लीजिये हम को शरण में राम पंथी हम बने।

ब्रह्मचारी धर्मरक्षक वीरव्रतधारी बने।।”

या प्रार्थनेला जोडून दोन शेवटी ओळी होत्या

।। भारत माता की जय ।।

।। राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय ।।

या प्रार्थनातील हिंदी श्लोकाची दुसरी ओळ मुळात वेगळी होती. शीघ्र सारे दुर्गुणोसे मुक्त हमको कीजिये,अशी ती ओळ होती. डॉक्टरांनी नकारात्मक आशय असलेली तो ओळ बदलून “शीघ्र सारे सद्गुणोसे

पूर्ण हिंदू कीजिये” अशी ओळ घेतली.हा केवळ शब्दातील बदल नव्हता,दृष्टिकोन आणि मानसिकतेतला बदल होता.संघ स्थापना करताना डॉक्टरांचा दृष्टिकोन किती सकारात्मक आणि निखळ स्वरूपाचा होता,हे यावरून लक्षात येईल.

संघाचे कार्य भारतात सर्वत्र वाढत होते. बंगाल, पंजाब, गुजरात, मद्रास, बंगलोर या प्रांतांत अशी मराठी व हिंदी प्रार्थना अर्थातच अडचणीची होती. बंगालमधील एका शाखेवर तर प्रार्थनेचे बंगाली भाषांतर करून प्रार्थना म्हणावी असा विचार ऐकिवात आला होता. काशी,इंदोर येथे प्रार्थनेचे उत्स्फूर्त हिंदी अनुवादही काहींनी केले होते. देशभर सर्वांना म्हणता येईल अशा भाषेत व संघ कार्याचे उद्दिष्ट स्पष्ट करणारी, मातृभूमीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी, चाल व लय असणारी प्रार्थना असावी, अशी आवश्यकता लक्षात येत होती. त्यासंदर्भात सखोल चिंतन झाले ते सिंदी बैठकीत.

१९३९ ची ऐतिहासिक चिंतन बैठक

संघाचे कार्य केवळ महाराष्ट्र आणि विदर्भात होते, तोपर्यंत संघाच्या कार्यपद्धतीचा फार सखोल, बारीक विचार करण्याची आवश्यकता असली तरी ती तीव्रतेने जाणवत नव्हती. त्यासाठी तेव्हा वेळही नव्हता. पण संघ देशव्यापी होऊ लागला तशी कार्यपद्धती विचारपूर्वक स्थिर केली पाहिजे, शाखा, शाखेची रचना, प्रार्थना, प्रतिज्ञा, आज्ञा, कार्यक्रम, यात सुसूत्रता आणि समानता त्याबरोबरच भारतातील सर्व प्रांतांत त्यांची स्वीकार्यता आणली पाहिजे हा विचार डॉक्टरांच्या मनात घोळू लागला. कार्यकर्त्यांशी विचारविनिमय होऊ लागला. कोणताही निर्णय सर्वांशी विचारविनिमय करूनच घेण्याची डॉक्टरांची पद्धती होती. खरे तर या सर्व संदर्भातील सारे निर्णय डॉक्टर हेडगेवार स्वतः घेऊ शकले असते. पण त्यांनी समूह चिंतनाला प्राधान्य दिले. त्या दृष्टीने १९३९ मध्ये सिंदी येथे एक प्रदीर्घ चिंतन बैठक आयोजित केली. नानासाहेब टालाटुले यांचे घरी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चचा पहिला आठवडा,अशी दहा दिवस ही बैठक चालली. डॉक्टरसाहेबांसह पू गुरुजी,बाळासाहेब देवरस,आप्पाजी जोशी,तात्या तेलंग,बाबाजी सालोडकर,नानासाहेब टालाटुले,विठ्ठलराव पत्की आणि कृष्णराव मोहरील या बैठकीत सहभागी होते.अनौपचारिक चर्चा,त्यातून काही निष्कर्ष, आणि कार्यवाहीच्या दृष्टीने निश्चित निर्णय असे स्वरूप होते.

या बैठकीत प्रार्थनेवर सखोल विचारमंथन झाले. संकार्याचे अखिल भारतीय स्वरूप लक्षात घेता प्रार्थना संस्कृत भाषेत असावी,यावर साऱ्यांचे एकमत झाले. प्रार्थनेत जे विचार,जो आशय व्यक्त करायचा त्याबद्दल, त्याच्या क्रमवारीबद्दल,स्वरूपाबद्दल समग्र चर्चा झाली. या चर्चेच्या आधारे आजच्या संस्कृत प्रार्थनेचे मराठी गद्यरूप तयार करण्यात आले.या गद्यरूपावरून संस्कृत जाणकारांकडून श्लोकरुपातील संस्कृत अनुवाद करण्यासाठी विविध ठिकाणी ते पाठविण्याचे ठरले. त्यातील सर्वोत्तम अनुवाद स्वीकारावा असेही ठरले. नागपूरचे प्रसिद्ध संस्कृत विद्वान नरहर नारायण भिडे मोहिते शाखेचे कार्यवाह होते.त्यांनाही डॉक्टरांनी मराठी गद्य दिले.भिडे यांनी आपले गुरु केशव गोपाळ ताम्हण यांचेशी चर्चा करून त्याला संस्कृत भाषेत श्लोकबद्ध केले.हे रूप सर्वमान्य ठरले. १९४० च्या प्रारंभी संघ प्रार्थना तयार झाली. यादवराव जोशी यांनी ती स्वरबद्ध केली आणि पुण्याला त्यांनीच ती पहिल्यांदा म्हटली. पुढे १९४० च्या नागपूर येथील संघ शिक्षा वर्गात सर्वाधिकारी असणाऱ्या श्री गुरुजींनी ती भैय्या शास्त्री या स्वयंसेवकाकडून म्हणवून घेतली. या वर्गात डॉ हेडगेवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे केवळ खाजगी समारोपाला उपस्थित होते.या वर्गाला देशाच्या सर्व प्रांतातून स्वयंसेवक आले होते.त्यामुळे वर्गानंतर संपूर्ण भारतात ही प्रार्थना प्रचलित झाली.

मातृभूमीला अभिवादन करतानाच तिच्यासाठी प्राणार्पणाचा संकल्प जागविणारी,हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक म्हणून भारतमातेच्या सअनंतकारणात र्वांगीण उन्नती साठी कटिबद्ध होण्यासाठी सर्वशक्तिमान परमेश्वराला

अजेय शक्ती, श्रेष्ठ चारित्र्य,सजग ज्ञान, दृढ वीरव्रत आणि अविचल ध्येयनिष्ठा यांचा आशीर्वाद मागणारी,धर्माच्या संरक्षणाचे कंकण हाती बांधणारी आणि भारतमातेला परम वैभवाच्या शिखरावर आरूढ करण्याचे ध्येय अंतःकरणात प्रज्वलित करणारी संघाची प्रार्थना रोज लाखो स्वयंसेवकांच्या समूह स्वरातून एकात्म, सामर्थ्यशाली, वैभवसंपन्न, सर्वजनमंगलकारी, विश्वगुरु हिंदुराष्ट्राच्या निनादाने आसमंत भारून टाकते आहे. या प्रार्थनेचे स्वर आता सातासमुद्रापारही पोहचले आहे. ते केवळ भारत भक्ती स्तोत्र न राहता विश्वमांगल्याच्या सुक्ताचे सामर्थ्य संघप्रार्थनेला आज प्राप्त झाले आहे.

– आशुतोष अडोणी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.