– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र
मुंबई :- महाविकास आघाडीचा मोर्चा हा संयुक्त खुर्चीसाठी सत्ता गमावलेल्यांचा शोक मोर्चा आहे. स्वबळावर किंवा आघाडीत राहूनही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळणार नाही याची जाणीव झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी संयुक्त खुर्चीसाठी अशा मोर्चाच्या माध्यमातून आटापिटा करण्यास सुरुवात केली आहे. संविधान वाचवा अशी हाकाटी देत खोटे नरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केल्याने लोकसभेला मविआ तील घटक पक्षांना 30 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम, निवडणूक आयोगाच्या कार्यावर शंका नव्हती पण विधानसभेला खोट्या नरेटिव्हला जनतेने नाकारून महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते देऊन सत्याच्या बाजूने कौल दिल्याने निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा मविआ नेत्यांनी नौटंकी करण्यास सुरुवात केली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बिहार विधानसभा निडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे सोबत गेलो तर राज यांच्या हिंदुत्वाच्या याआधीच्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या खानाच्या पिल्लावळींच्या मतांची चिंता आहे त्यामुळे काँग्रेसने सोयीस्कररित्या मोर्चापासून पळ काढला अशी टीका बन यांनी केली. काँग्रेसचे आधीच सर्वदूर पानीपत झालेले असताना ते कुठलाही धोका पत्करू इच्छित नाहीत. मविआच्या मोर्चासाठी काँग्रेसचा ना कुठे झेंडा ना बॅनर असे चित्र आहे. मविआच्या मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्याचे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
मविआमध्ये राज ठाकरे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत
राज ठाकरेंचा मनसे पक्षदेखील अस्तित्व दाखवण्यासाठीच्या अपरिहार्यतेतून पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत मविआसोबत गेल्याची बोचरी टीका बन यांनी केली. मविआचा चित्रपट मतदारांनी सपशेल फ्लॉप केल्याने आता निवडणुकांच्या तोंडावर मविआचा चित्रपट थोडातरी चालावा यासाठी राज यांना पाहुण्या कलाकाराची भूमिका देण्याची क्लुप्ती मविआने केली आहे असा निशाणाही त्यांनी साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्षम नेतृत्व आणि विकासाचे राजकारण असल्याने असे कितीही पाहुणे कलाकार आणलेत तरी मविआचा चित्रपट सुपर फ्लॉप होणार असा विश्वास बन यांनी व्यक्त केला. मत चोरीचा नक्षल्यांचा अजेंडा राहुल गांधी यांनी पुढे रेटण्याचे काम केले आणि आता तोच अजेंडा दुर्दैवाने राज ठाकरे, उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. परंतु महाराष्ट्रातली जनता सूज्ञ असून त्यांना घरचा रस्ता दाखवेल असे बन म्हणाले.
बाळा नांदगावकरांवर निशाणा साधत बन म्हणाले की, लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या, कर्नाटकमध्ये ईव्हीएमवर काँग्रेस जिंकली, तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा जर मनसेने मोर्चा काढला असता तर भाजपा त्यामध्ये नक्की सहभागी झाली असती असे बन यांनी स्पष्ट केले.
‘मविआ’चे पोलिंग एजंट तेव्हा झोपले होते का?
मतदानावेळी प्रत्येक पक्षाचा पोलिंग एजंट प्रत्येक बूथवर उपस्थित असतो. विधानसभा निवडणुकीवेळी जर मविआच्या घटक पक्षांना शंका होती तर तेव्हा त्यांच्या पोलिंग एजंटने आक्षेप घेत तक्रार का केली नाही असा परखड प्रश्न श्री. बन यांनी रोहित पवार यांना केला. मतदारांची ओळखपत्रे तपासण्याचा अधिकार पोलिंग एजंटला असताना एकाही पोलिंग एजंटने बोगस मतदारावर आक्षेप का घेतला नाही असाही सवाल बन यांनी केला.



