किशोर साहू, मौदा ,ता.३१:- सालवा येथील जि प प्राथमीक शाळेत एक ते चार वर्ग असून, एकमेव शिक्षिका ए एम गणवीर असलेल्या या शाळेची पटसंख्या आता फक्त 9(नऊ) असून एक अंकी संख्येवर येऊन ठेपलेली आहे!
शाळेची गुणवत्ता व पटसंख्या वाढवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील धाराशी गावात मुख्यालयी राहून आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी मुबारक सय्यद यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. जि प शाळेतील दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पट संख्येला वाढवण्यासाठी शिक्षकांनी मुबारक सय्यद यांचे अनुकरण करण्याची अत्यंत गरज असताना, पटसंख्या आता एक अंकी संख्येवर जाऊन ठेपलेली असतानाही सालवा जि प शाळेतील शिक्षिका ए एम गणवीर या सालवा येथून 38 किलोमीटर दूर असलेल्या कुही वरून दररोज अपडाऊन करत असल्याचे वार्तालाप करताना सांगितले.
जि प शाळेतील शिक्षकांनी मुख्यालयी राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास शाळेची पटसंख्या वाढते, गाव खेड्यात सर्व दळणवळणाचे साधने झाल्याने आता तरी शिक्षकांनी नियुक्त असलेल्या गावात मुख्यालय राहून गुणवत्ता पूर्ण शिक्षण द्यावे व एक अंकी आलेल्या पट संख्येला शून्य होऊ न देता किमान दोन अंकी तरी टिकवून ठेवावे अशी मागणी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सालवा येथील पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.




