– अ.भा.स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थानिक स्वराज्य संस्था दिवस उत्साहात साजरा
नागपूर :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेतात व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रूजू होतात. समाजामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून लोकभिमुख कार्य करणारे, सक्षम, कार्यक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्था गेली 100 वर्षे करीत आहे व भविष्यात ही करत राहील असा विश्वास नगरसेवक तथा स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दाणी – वखरे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे स्थानिक स्वराज्य दिनाचे आयोजन नागपूरच्या साई सभागृहात आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. नवनियुक्त नगरसेवकांना पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिल्यास त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल असेही त्या पुढे म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सारिका नंदुरकर व विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते. संस्थेचे पहिले महासंचालक स्व. सी डी बर्फीवाला यांच्या जयंती निमित्त दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्था दिवस देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व लोकांपुढे यावे हा उद्देश असतो.
सारिका नांदुरकर यांनी मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अभ्यासक्रम रोजगारक्षम आहेत असे सांगून त्यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक प्रास्ताविक केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना मुळातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी झाली. संस्थेच्या स्थापनेमध्ये इतिहासातील मातब्बरमंडळींचा सहभाग आहे. यामध्ये गुलाम हुसेन हिदायत्त्तुल्ला, विठ्ठलभाई पटेल, दादासाहेब माळवणकर, सी.डी.बर्फीवाला यांचा समावेश आहे. संस्थेमार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रमही कर्मचाऱ्यांना सक्षमता प्रदान करणारे असून यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे जयंत पाठक म्हणाले.
संस्था गीताने व कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यांनंतर मान्यवरच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, स्व. बर्फीवाला यांना अभिवादन केले गेले. नंतर संस्थेमार्फत संचालित करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये स्वच्छता निरिक्षक अभ्यासक्रमातून प्रथम क्रमांक तिनेश्वर जाधव आणि मानसी जायपूरकर यांना स्व.मोहन जावडेकर स्मृती, द्वितीय क्रमांक प्रतीक जाधव आणि सुदर्शन देवघरे यांना श्रीपाद मुजुमदार स्मृती, तृतीय क्रमांक ऋषिकेश बहिरे आणि संघदीप वासनीक यांना स्व.हितेश हेरॉल्ड स्मृती तर स्थानिक स्वराज्य संस्था पदविका या अभ्यासक्रमात प्रशांत वानखेडे आणि उमेश भडाले यांना एम.पी. टाकसांळे स्मृती, अग्निशमनकर्मी अभ्यासक्रमातून अनिकेत दुडहे, गणेश ऊज्वलकर व अभिषेक बोस यांना हरिदास वायगोकर स्मृती पुरस्कार देण्यात आला. यामध्ये स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीसे देण्यात आली.
रक्तदान शिबिराचे आयोजन
स्थानिक स्वराज्य दिनाचे औचित्यसाधून संस्थेतर्फे डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या माध्यमाने सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या मूंजे उपस्थित होत्या. त्यांचा संस्थेद्वारे अग्निशमन अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. प्राची नाटकर हिने सत्कार केला.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, अध्यापक व स्व. वायगोकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



