– हसतमुख, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
कामठी :- कामठी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात आपल्या सेवाभावी कार्याने ठसा उमटविणारे, हसतमुख, मनमिळाऊ आणि आपुलकीच्या स्वभावाचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विवेक चंदनानी वय ५९ वर्षे रा कामठी यांच्या निधनाने कामठीचा अनमोल हिराच निखळला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच मित्रपरिवार, रुग्ण, हितचिंतक आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली.
डॉ. विवेक चंदनानी यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे वैद्यकीय सेवेसोबत माणुसकीचा जिवंत आदर्श होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य, प्रेमळ वागणे, प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधण्याची हातोटी आणि आपलेपणाची भावना यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या स्मरणात त्यांचा हसरा चेहरा आणि दिलखुलास स्वभाव कायम राहणार आहे.
रुग्णांसाठी ते केवळ चिकित्सक नव्हते, तर विश्वासाचा आधार होते. त्यांच्या आपुलकीच्या शब्दांनी आणि समजूतदारपणाने अनेकांना धीर मिळत असे. त्यामुळे त्यांच्या निधनाने केवळ चंदनानी कुटुंबीयांनीच नव्हे, तर कामठी शहराने आपला जिव्हाळ्याचा माणूस गमावला आहे.
अचानक काळाने हिरावून नेलेला हा अनमोल हिरा पुन्हा कधीच परतणार नाही; मात्र त्यांच्या माणुसकीच्या आठवणी आणि सेवाभावी कार्याचा सुगंध सदैव दरवळत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ भरून निघणे अशक्य आहे.
डॉ. विवेक चंदनानी यांची अंत्ययात्रा सोमवार, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता गोकुळधाम येथील निवासस्थानावरून निघून अजनी येथील नवीन मोक्षधाम येथे जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.








