सुरज बंडीवार: पांढरकवडा :- भोवती काळोख होता परिस्थिती प्रतिकूल होती पण त्या काळ्याकुट्ट अंधारातही शिक्षणाची जिद्द,ज्ञानाची ओढ,आणि काहीतरी मोठं करून दाखवायची आस सतत पेटलेली होती. हीच जिद्द पांढरकवडा येथील आकाश प्रकाश वल्लमवार यांना आयुष्यात यशस्वी बनवणारी ठरली. आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या केळापूर तालुक्यातील पांढरकवडा शहरातील सिंघानिया नगर येथील सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला आकाश घरी कोणतेही शैक्षणिक वातावरण नसतानाही शिक्षणाच्या वाटेवरून कधीच डगमगला नाही. घरातील आर्थिक अडचणी,साधनसामग्रीचा अभाव,आणि अनेक अडथळ्यांवर मात करत त्याने रसायनशास्त्रात एम.एस.सी व बी.एड पूर्ण केले. इतकेच नव्हे तर पुण्यातील प्रसिद्ध Allen Career Institute मध्ये अध्यापनाची नोकरी करत असतानाच त्याने नेट (National Eligibility Test) या राष्ट्रीय स्तरावरील कठीण परीक्षेत रसायनशास्त्र विषयात घवघवीत यश मिळवले आणि आपल्या गावाचे नाव उंचावले. आकाशने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे. जिद्द,चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर गरीबीतही मोठं स्वप्न पूर्ण करता येतं हे त्याने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या यशामागे आई-वडील यांचे प्रोत्साहन व काका जयवंत वल्लमवार यांचे मार्गदर्शन आणि स्व.जगदीश वल्लमवार यांचे आशीर्वाद या सर्वांचा मोलाचा वाटा आहे.या यशाबद्दल बोलताना आकाश वल्लमवार म्हणाले,”हे यश माझ्या पालकांचे व काकांचे आशीर्वाद,गुरुजनांची शिकवण, आणि माझ्या अखंड परिश्रमाचे फळ आहे. शिक्षणाच्या मार्गात आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत, सातत्याने प्रयत्न केल्यानेच आज मी या टप्प्यावर पोहोचलो आहे. माझे ध्येय म्हणजे पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान बणने आणि शिक्षणाचे महत्त्व प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणे. आकाशच्या या यशाबद्दल विदर्भ बेलदार व तत्सम जाती समाज संघटना सह सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाज बांधव,मित्रमंडळी, शिक्षकवर्ग तसेच स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठित व्यक्तींकडून त्याचे अभिनंदन होत आहे. शहरात आनंदाचे वातावरण असून सर्वजण त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. आकाशच्या कर्तृत्वाने पांढरकवडा शहरातील युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याची कहाणी ही केवळ यशोगाथा नसून,प्रत्येक ग्रामीण,आदिवासी आणि सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



