spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून

मुंबई :- राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली असून 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये हे स्पर्धात्मक अभियान काही नवीन उपक्रमांसह राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण 72 कोटी 22 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

अभियानाची व्याप्ती

या अभियानासाठी शाळांची विभागणी (अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि (ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबविण्यात येईल.

अभियानाची उद्दिष्टे

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

अभियानाचा कालावधी

या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी असेल. 3 नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. तर, 31 डिसेंबर 2025 रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल.

अभियानाचे स्वरूप

अभियानात सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा- 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी- 101 गुण आणि शैक्षणिक संपादणूकसाठी- 61 गुण असे एकूण 200 गुण असतील.

मूल्यांकन समिती

अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार असून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी कोकण विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली तर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये तालुकास्तरावरील मूल्यांकनासाठी प्राथमिक स्तरावर समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावरील मूल्यांकनासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती असेल. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर विभाग स्तरावरील मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. राज्य स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य करण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल.

पारितोषिके

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असेल. जिल्हास्तरावर (मुंबई शहर एक जिल्हा, मुंबई उपनगर एक जिल्हा) प्रथम पारितोषिक अकरा लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पाच लाख रुपये, तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये असेल. तर, महानगरपालिका स्तरावर प्रथम पारितोषिक 21 लाख रुपये द्वितीय पारितोषिक 15 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक अकरा लाख रुपये असेल. वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रासाठी देखील पारितोषिकांची रक्कम याचप्रमाणे राहील.

उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असेल. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक 11 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पाच लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये असेल. विभागस्तरीय प्रथम पारितोषिक 21 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 15 लाख रुपये तर तृतीय पारितोषिक 11 लाख रुपये असे असेल.

राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी प्रथम पारितोषिक 51 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 31 लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक 21 लाख रुपये असेल. पारितोषिकांची एकूण रक्कम 72 कोटी 22 लाख रुपये इतकी असेल.

शाळांना मागील वर्षीच्या टप्पा-एक किंवा टप्पा-दोनमध्ये प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा खालच्या (निम्न) क्रमांकासाठी शाळेचा यावर्षीच्या अभियानात पारितोषिकांसाठी विचार केला जाणार नाही. यावर्षीच्या अभियानातील मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविल्यास यावर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यासच त्या क्रमांकास शाळा पात्र राहील. मूल्यांकनामध्ये सर्वोत्तम कार्य असणाऱ्या राज्यातील विविध स्तरांवर बक्षीस पात्र शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचा यथोचित सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल, असे या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.