spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बाबासाहेबांवरील निष्ठेतूनच ‘उजेडवास्तवाचे क्रांतिसंग्राम’ घडतो – इ.झेड.खोब्रागडे

नागपूर :- प्रसिद्ध आंबेडकरी कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते तथा प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मुरलीधर मेश्राम यांनी संकलित- संपादित केलेल्या ‘उजेडवास्तवाचे क्रांतिसंग्राम’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी तथा संविधान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इ. झेड. खोब्रागडे (भा.प्र.से.निवृत्त) होते. यावेळी बोलतांना त्यांनी, “भर उन्हात ज्वालांचे शेले पांघरणारे डॉ. महेंद्रकुमार मेश्राम हे केवळ व्यवस्थेला प्रश्न विचारणारे कवी नसून त्याच्या निराकरणासाठी रचनात्मक आणि विकासात्मक कार्य करणारे आंबेडकरनिष्ठ कार्यकर्ते आहेत. बाबासाहेबांवरील निष्ठेतूनच ‘उजेडवास्तवाचे क्रांतिसंग्राम’ घडतो,” असे प्रतिपादन केले.

संविधान फाऊंडेशन, च्या आयोजनाखाली व स्तंभ पब्लिशिंग हाऊस, चंद्रपूर यांच्या प्रकाशनातून प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार तथा आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरचे अध्यक्ष दादाकांत धनविजय यांच्या हस्ते झाले. यावेळी अ.भा.गौर बंजारा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड, आंबेडकरी लेखक डॉ. अनमोल शेंडे, प्रकाशक कवी अविनाश पोईनकर आणि कवी सुरज दहागावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी दादाकांत धनविजय यांनी डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या साहित्यिक आणि सामाजिक जडणघडणीवर प्रकाश टाकत, त्यांच्या कविता निर्भीड, वास्तववादी आणि विद्रोही असून शोषित- वंचितांच्या वेदनांना प्रभावीपणे अभिव्यक्त करतात, असे सांगितले. भाष्यकार डॉ. अनमोल शेंडे आणि डॉ. प्रकाश राठोड यांनीही डॉ. मेश्राम यांच्या कवितेतून संविधानिक मूल्यांचा जागर होत असल्याचे मत व्यक्त केले प्रकाशक अविनाश पोईनकर आणि कवी सुरज दहागावकर यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी पुस्तकामागील संपादकीय भूमिका स्पष्ट केली. डॉ.सुशील मेश्राम यांनी संचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन निर्जरा मेश्राम यांनी तर आभार छाया मेश्राम यांनी मानले. या सोहळ्यास डॉ.जयराम खोब्रागडे, लोकनाथ यशवंत, इ.मो.नारनवरे, शालिक जिल्हेकर, संजय गोडघाटे, नरेंद्र शेलार, मनोहर गजभिये, डॉ. शुभांगी वडस्कर, डॉ. नरेश कोलते, रामभाऊ आंबुलकर, सूर्यकांत मुनघाटे, डॉ.पुनम येसंबरे, संध्या राजुरकर यांच्यासह साहित्य, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच आंबेडकरवादी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संविधान फाऊंडेशनच्या रेखा खोब्रागडे, दिपक निरंजन, छाया मेश्राम, अल्का निरंजन, विजय बेले, दिगांबर गोंडाणे, हरिदास बेलेकर, नेहा खोब्रागडे, निर्जरा मेश्राम, शिरीष कांबळे, कल्पना कांबळे, निलेश बोबडे, राजीव काथवटे,रश्मी चांदुरकर, शरदसिंह बैस, सतीश भराडे, राजेंद्र झोड, गोकुळ आष्टणकर आणि सदाशिव गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles