चारचाकीसाठी 5 लाख आणण्याचा तगादा

0
3

– पुण्यात IT इंजिनिअर विवाहितेने जीवन संपवलं

पुणे :- पुण्यातील वडाचीवाडी परिसरातील वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या एका नवविवाहित उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. गुरुवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. लग्नाला अवघे चार महिने पूर्ण झाले असतानाच घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

वैष्णवी ओंकार गिसरे (वय 24, रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे) असे जीवन संपवलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे (वय 51, रा. कोडीत खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पती, सासू अन् सासऱ्यांवर गुन्हा दाखल

वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलिसांनी वैष्णवीचा पती ओंकार संजय गिसरे (वय 28), सासरे संजय महादेव गिसरे (वय 49) आणि सासू रुपाली संजय गिसरे (वय 42, सर्व रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे) यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

45 लाखांचा खर्च अन् 10 तोळे सोन्याची भेट, तरीही 5 लाखांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह 9 मे 2026 रोजी ओंकार गिसरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी माहेरच्या मंडळींनी सुमारे 45 लाख रुपये खर्च केले होते, तसेच 10 तोळे सोनेही भेट म्हणून दिले होते. तरीही विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. या कारणावरून वैष्णवीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. सासरच्या या छळाला वैतागून अखेर गुरुवारी रात्री तिने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून टोकाचे पाऊल उचलले. या घटनेचा पुढील अधिक तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.