spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एम पी एस सी अभ्यास करणाऱ्या तरुणाकडून चोरी

– नविन कामठी पोलिसांकडून पर्दाफाश, २.५ लाखांची यामाहा वाहन R15 जप्त

कामठी :- नविन कामठी पोलिसांनी एका हाय-प्रोफाइल चोरीचा पर्दाफाश करत, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची तयारी करणाऱ्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपीने चोरीचे तंत्र यूट्यूबवर पाहून शिकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून नविन कामठी आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या सुमारे ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यूट्यूब पाहून केली चोरी

नविन कामठी पोलीस ठाण्यात २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मनीष वैजनाथ शाहू (वय ४०) यांनी भाटिया लॉन, कामठी रोड येथून त्यांची २ लाख ५० हजार रुपये किमतीची यामाहा R15 (एम.पी.१७ झेड बी.१२१४) मोटरसायकल चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी लग्नाच्या कार्यक्रमात व्हिडिओग्राफीसाठी आले असताना ही घटना २३ नोव्हेंबरच्या रात्री ८:३० च्या सुमारास घडली होती.या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने तपास सुरू केला.

तांत्रिक पद्धतीने मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेले वाहन पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरोडी गावात एका गॅरेजसमोर उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दिनांक १२ डिसेंबर रोजी दुपारी १२:१५ वाजता पोलीस पथक (पो.हवा. नरेश खरकबान, पो. अं. नसिम अन्सारी, पो. अं. राहुल वाघमारे) त्या ठिकाणी गेले. वॉच ठेवत असताना, थोड्याच वेळात निखिल योगेश रहांगडाले (वय २२ वर्ष, रा. गिडडोबा नगर, वाठोडा ले-आऊट, नागपूर) नावाचा तरुण तोंडात गमछा बांधून आला आणि त्याने त्या गाडीला चावी लावण्याचा प्रयत्न केला.

चौकशीत झाली दुसऱ्या गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नविन कामठी पोलीस ठाण्यात आणले. कसून चौकशी केल्यावर त्याने भाटिया लॉन येथून यामाहा R15 चोरी केल्याची कबुली दिली.

यासोबतच, त्याने जगनाडे चौक, सेवन स्टार हॉस्पिटलजवळ, श्री निकेतन क्लासेस येथून आणखी एक काळ्या रंगाची बजाज पल्सर (एम.एच.४९ सी.ई.००७३) मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. हा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल होता.

नवीन कामठी पोलिसांनी आरोपी कडून  नविन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत यामाहा R15 (काळ्या रंगाची) २,५०,००० रु.कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील बजाज पल्सर (काळ्या रंगाची) १,६०,००० रु.एकूण 4 लाख 10 हजार हस्तगत केले.

पोलिसांनी आरोपी निखिल रहांगडालेला अटक केली असून, त्याने हे चोरीचे कृत्य एम पी एस सी अभ्यासासाठी लागणाऱ्या खर्चासाठी केले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल , सह.पो. आयुक्त नवीनचंद्र रेड्डी , अप्पर पो. आयुक्त दाभाळे आणि पोलीस उप आयुक्त संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.